राष्ट्रवादीशी आघाडी अशक्‍य - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष भाजपविरोधात प्रचाराचा अजेंडा राबविणार आहे. नोटाबंदी करून मोदी सरकारने जे वाटोळे केले, तो मुद्दा आम्ही या निवडणुकीत "हायलाइट' करणार आहोत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत दिल्लीत चर्चा सुरू असली, तरी ही आघाडी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार यासंदर्भात आज पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""कॉंग्रेसमधून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज आम्ही मागविले आहेत. इच्छुकांचे चेहरे, त्यांचे शिक्षण आणि क्षमता पाहून आरक्षणाच्या जागा लक्षात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र स्क्रीनिंग समिती असेल. ती उमेदवारी कोणाला द्यायची ते ठरवेल.''

राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची शक्‍यता आहे का, या प्रश्‍नावर श्री. चव्हाण म्हणाले, 'राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सध्या दिल्लीत चर्चा सुरू आहे. अद्यापपर्यंत वरून काहीही सांगितलेले नाही; पण आघाडी होणार नाही. जिल्ह्यात तर आघाडीचा चान्सच नाही. कऱ्हाड दक्षिणमध्येच एखाद्या जागेत झाली तर पाहू; अन्यथा आमची राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची इच्छा नाही.''

या निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचाराचा मुद्दा कोणता असेल, असे विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, 'आमचा अजेंडा भाजपविरोधात लढायचा असेल. भाजपने नोटाबंदी करून देशाचे वाटोळे केले आहे. हाच मुद्दा आम्ही या निवडणुकीत प्रकर्षाने मांडणार आहोत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही जिल्ह्यात कॉंग्रेसतर्फे प्रचाराचा नारळ फोडू. आताच घाई करणार नाही.''

मुलाखती 24 किंवा 25 जानेवारीला
कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्यात उमेदवारी अर्ज उपलब्ध केले आहेत. येत्या 24 वा 25 जानेवारीला इच्छुकांच्या मुलाखती कॉंग्रेस भवनात घेतल्या जातील, असे सांगून जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील म्हणाले, 'जिल्हा परिषदेची ही निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होईल. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, हिंदूराव नाईक-निंबाळकर हेही असतील.''

Web Title: congress & ncp aghadi unsuccess