Vidhansabha2019 : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय १५ ऑगस्टपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

उमेदवारीचा निर्णय आणि समविचारी पक्षांशी आघाडीबाबत चर्चा होईल. या सर्व बाबी १५ ऑगस्टपर्यंत निश्‍चित करून उमेदवारांची घोषणा होईल, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राज्यातही मुलाखतींचा कार्यक्रम सुरू आहे. जुलैअखेर हा कार्यक्रम संपणार आहे. हा अहवाल प्रदेशकडे सादर केला जाणार आहे. यानंतर उमेदवारीचा निर्णय आणि समविचारी पक्षांशी आघाडीबाबत चर्चा होईल. या सर्व बाबी १५ ऑगस्टपर्यंत निश्‍चित करून उमेदवारांची घोषणा होईल, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. शनिवारी (ता. २७) आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्किट हाऊस येथे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही ताकदीचे उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. खासदार शरद पवार व राष्ट्रवादीवर विश्‍वास ठेवूनच त्यांनी मुलाखत दिली. पक्ष देईल तो निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इच्छुकांनी मुलाखती दिल्या तरी संभाव्य आघाडी, जागा वाटप या बाबीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी निश्‍चित नाही. पक्षश्रेष्ठीच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला जिल्हाध्यक्षा संगिता खाडे, जहिदा मुजावर, अनिल साळोखे, रोहित पाटील उपस्थित होते.

मतदारसंघनिहाय इच्छुक 

  •   कागल ः आमदार हसन मुश्रीफ, भैया माने 
  •   कोल्हापूर दक्षिण ः रोहित पाटील, निरंजन कदम, महादेव माने 
  •   करवीर ः सोनाजी पाटील, मधुकर जांभळे 
  •   शाहूवाडी ः बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष धुमाळ 
  •   हातकणंगले ः भास्कर शेटे, अनिल कांबळे, लखन बेनाडे 
  •   इचलकरंजी ः नितीन जांभळे, बाळासाहेब देशमुख 
  •   शिरोळ ः राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंगेजखान पठाण 
  •   कोल्हापूर उत्तर ः उद्योजक व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, हसीना बाबू फरास, आदिल फरास, रोहित पाटील, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण 
  •   राधानगरी ः के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, रणजित के. पाटील, विकास के. पाटील, धैर्यशील पाटील-कौलवकर, उमेश भोईटे.

के.पी. गोतावळ्यासह मैदानात
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात के. पी. पाटील यांचा सगळा गोतावळाच उतरल्याचे चित्र आहे. के. पीं.नी उमेदवारी मागितलीच आहे; पण त्यांचे पुत्र रणजित पाटील, विकास पाटील यांनीही उमेदवार मागितली. त्यांचे जावई व भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील-कौलवकर यांनीही उमेदवारी मागितली. तसेच मेहुणे ए. वाय. पाटील यांनीही उमेदवारी मागितली असली तरी त्यांनी के.पीं.च्या विरोधात उमेदवारी मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress - NCP alliance decision till August 15