काँग्रेस- राष्ट्रवादीचा 'हम साथ साथ हैऽऽऽ'चा नारा

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

भाजपला सत्तेतून खेचणे, हे दोन्ही कॉंग्रेसचे ध्येय आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. 
- प्रणिती शिंदे, आमदार सोलापूर शहर मध्य 

सोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच एकत्रित येत असून, संयुक्त मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरवात डिसेंबरमध्ये होईल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे "मोदी के खिलाफ हम साथ साथ हैऽऽऽ..' म्हणत या दोन्ही पक्षांतील नेते एकत्रित येण्याचे संकेत आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. भाजप हा कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू आपला मित्र या न्यायाने हे दोन पक्ष एकत्रित येणार आहेत. या संदर्भात श्री. पवार आणि सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. 

विविध कारणांवरून भाजपबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित येणे काळाची गरज आहे, असे दोन्ही पक्षांतील धुरिणांचे मत झाले असून, त्यानुसार व्यूहरचना आखली जात आहे. 

वाढती महागाई, जीएसटी आणि विकासकामांच्या केवळ घोषणा यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे, अनेक कंपन्या व औद्योगिक संस्था डबघाईला आल्या आहेत, या मुद्‌द्‌यांबाबत दोन्ही कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. त्याला अनुसरून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणती ध्येयधोरणे आखता येतील, याची चाचपणी सुरू झाली आहे. 

भाजपला सत्तेतून खेचणे, हे दोन्ही कॉंग्रेसचे ध्येय आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. 
- प्रणिती शिंदे, आमदार सोलापूर शहर मध्य 

दोन्ही कॉंग्रेस एकत्रित याव्यात, ही तमाम मतदार व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने हे पाऊल असून डिसेंबरमध्ये याबाबत घोषणा होऊ शकेल. 
- संतोष पवार, कार्याध्यक्ष सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: Congress NCP alliance in Solapur