कॉंग्रेस-राष्ट्रवादीने संघर्ष नव्हे तर आता काशीयात्रा करावी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

वाळवा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षांचे पाप धुण्यासाठी संघर्ष यात्रेपेक्षा आता काशीयात्रा करावी, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत येथे हाणला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकार अनुकूल आहे, शिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांचाही सरकार योग्य तो सन्मान करेल असे ते म्हणाले.

वाळवा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षांचे पाप धुण्यासाठी संघर्ष यात्रेपेक्षा आता काशीयात्रा करावी, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत येथे हाणला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकार अनुकूल आहे, शिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांचाही सरकार योग्य तो सन्मान करेल असे ते म्हणाले.

शासनाच्या कृषी विभागातर्फे 46 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर अनुदान वाटप, 2 कोटी 45 लाखांच्या वाळवा-बावची रस्त्याचे व 1 कोटी 85 लाख रुपये खर्चाच्या हाळभाग ते जुनेखेड रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन मंत्री खोत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हुतात्मा चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्माचे वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महिला व बालकल्याणच्या सभापती डॉ. सुषमा नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव, आशिष काळे, अपर्णा साळुंखे, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, भास्कर कदम, बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. वरील रस्त्यांच्या निधीसह ग्रामपंचायतीला अंतर्गत विकासासाठी सुमारे 40 लाखांचा निधी मंत्री खोत यांनी दिला आहे.

मंत्री खोत म्हणाले,""तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वाळव्याकडे कायमच दुर्लक्ष केले. आम्ही मात्र राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत आहोत. तुरीवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. मात्र शासनाने 46 लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. उर्वरित तूर खरेदीसाठी नाफेडची केंद्रे सुरू करण्यात येतील. प्रत्येक बाजार समितीत सातबारा धारक सर्वच शेतकरी सभासद होतील. त्यांना मताचा अधिकार मिळेल. त्याशिवाय सभापती, उपसभापतींची निवड थेट मतदानातून होईल. कृषी पंपाच्या वाढीव वीज दरासंदर्भात इरिगेशन फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ.'' यावेळी आमदार नाईक, वैभव नायकवडी, निशिकांत पाटील यांचे भाषण झाले. सरपंच गौरव नायकवडी यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: congress ncp should do kashi yatra, says sadabhau khot