‘स्वाभिमानी’ला आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळ

सुनील पाटील
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - उसाला जास्तीत जास्त दर मिळावा, दहा टक्के बेस पकडून काढली जाणारी रिकव्हरी तत्काळ रद्द करावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरात तीव्रतेने आंदोलन केले जाणार असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर - उसाला जास्तीत जास्त दर मिळावा, दहा टक्के बेस पकडून काढली जाणारी रिकव्हरी तत्काळ रद्द करावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोल्हापुरात तीव्रतेने आंदोलन केले जाणार असल्याचे चित्र आहे.

ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना घेत असलेल्या निर्णयाला किंवा आंदोलनाला काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चा बाहेरून पाठिंबा असणार आहे. शेतकऱ्यांना उसाचा जादा दर मिळावाच; पण यानिमित्त सरकारला कोंडीत पकडण्याची संधी ही काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’कडून मिळणार असून, समविचार पक्ष, संघटना याच मुद्द्यावरून एकत्र येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

खासदार राजू शेट्टी दोन वर्षांची सत्ता भोगून सत्तेतून बाहेर पडले, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फुटून बाहेर पडलेल्या सदाभाऊ खोत यांच्याकडून शेट्टी आणि संघटनेवर जाहीर टीका केली जात आहे. दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. तसेच, शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात जास्तीत जास्त एफआरपी मिळावी, हे मुद्दे केंद्रस्थानी धरून या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. यात शेतकरी संघटनेला काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’कडून बाहेरून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे संघटनेचे आंदोलन पूर्वीप्रमाणेच आक्रमक आणि सरकारला विचार करायला लावणारे असणार आहे. राजू शेट्टी भाजपबरोबर गेल्यानंतर आंदोलनाऐवजी चर्चेतून ऊस दराचा प्रश्‍न सोडविण्याचा मार्ग अवलंबला होता. त्याआधी संघटनेचे आंदोलन म्हणजे सरकारला धडकी भरणारेच असायचे. 

भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर खासदार शेट्टी हे दूधदर, साखर, कापूस, कडधान्य तसेच कापसाच्या कमी दरावरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका करीत आहेत. राज्यभर विविध मेळावे आणि आंदोलन करीत आहेत. शेट्टींचा सरकारविरोधी आक्रमकपणा पाहून काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चे जिल्हा पातळीवरील नेतेही त्याला सकारात्मक पाठिंबा दर्शवत आहेत. काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चे जिल्हा पातळीवरील नेते शेट्टी सांगतात ते योग्य आहे, असे जाहीर बैठकीत किंवा सभेतही बोलत आहेत. 

याच दरम्यान, राजू शेट्टीही काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वांचाच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर एकविचार होत आहे. बुधवारी दिल्लीत बळीराजावर भारतीय किसान युनियन मोर्चाला पोलिसांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर थांबविल्याने शेतकरी संतप्त होऊन आंदोलन चिघळले होते. यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता. त्यामुळे जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वाभिमानीच्या आंदोलनाला बळ देत राहणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सध्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशातच शेतकरी दुर्लक्षित होत असताना दिसत आहे. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून चांगला निर्णय घेतला जात असेल, तर काँग्रेस पक्ष म्हणून आमचाही त्यांना पाठिंबा दिला जाईल.
- आमदार सतेज पाटील

Web Title: congress - NCP support swabhimani agitation