गोरेंवरील गुन्ह्यांबद्दल कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर गोरे हे या निवडणुकीतील उमेदवारांत सर्वात श्रीमंत आहेत; मात्र त्यांच्यावर विविध प्रकारचे बारा गुन्हेही नोंद आहेत. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कॉंग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. त्यांच्याकडे एकूण 38.86 कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 

विधान परिषदेसाठी आठ उमेदवारांकडून 13 अर्ज दाखल झाले होते. त्याची गुरुवारी छाननीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निरीक्षक तथा कृषी आयुक्‍त व्ही. व्ही. देशमुख व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही छाननी झाली. या अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्र व संपती विवरणपत्रात सर्वांनी संपत्तीची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी स्वतः व पत्नीकडील संपत्तीची माहिती दिली आहे. 
राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. गोरेंकडे स्थावर मालमत्तेत ग्रामीण, शहरी भागात अनेक ठिकाणी जमिनी व प्लॉट आहेत. ते स्वतः व त्यांच्या पत्नीकडे 43 तोळे सोन्याचे दागिने आहेत. चारचाकी व दुचाकीसह 59 वाहने आहेत. बॅंक, संस्थांकडून 9 कोटी 56 लाख 79 हजारांचे कर्ज घेतले आहे. गोरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरोधात सातारा जिल्ह्यात मारहाण, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, आचारसंहिता भंगाचे असे 12 गुन्हे नोंद असल्याचे म्हटले आहे. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गोरेंवरील गुन्ह्यांचा मुद्दा पुढे करीत कॉंग्रेसच्या मोहनराव कदम यांच्या वकिलांनी छाननी वेळी आक्षेप घेतला. मात्र तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. 

कॉंग्रेसचे उमेदवार श्री. कदम यांनी 5.30 कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शेखर मानेंची 3.65 कोटींची स्वतः आणि पत्नीच्या नावे असणारी जंगम व स्थावर मालमत्ता प्रतिज्ञापत्रात व संपत्ती विवरणपत्रात नमूद केलेली आहे. राष्ट्रवादीचे डमी उमेदवार अरुण लाड यांनी 76 लाख, मावळते आमदार प्रभाकर घार्गे यांची 25 कोटी 17 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

Web Title: Congress rejected the objection crimes against Gorhe