भाजपच्या "या' बालेकिल्ल्यात कॉंग्रेस-शिवसेनेचा सायंजल्लोष 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

भाजपच्या प्रतिकाला लावणार सुरुंग

बाळीवेस चौक हा भाजपच्या बालेकिल्ल्याचा प्रतीक आहे. मात्र आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन या "प्रतिका'लाच सुरुंग लावणार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत या मतदारसंघातील भाजपचा बालेकिल्ला ढासळलेला असेल. 
-प्रकाश वाले, शहराध्यक्ष 
सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस समिती 

सोलापूर ः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील बाळीवेस येथील "विजय चौक' म्हणजे या मतदारसंघात भाजपला मिळालेल्या यशाचे प्रतीक आहे. त्याच चौकात आज गुरुवारी सायंकाळी कॉंग्रेस, शिवसेना आणि महाआघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष करणार आहेत. निमित्त आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राज्याभिषेकाची. सायंकाळी शपथविधी सोहळा सुरु झाला की जल्लोषाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती कॅंाग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आज सकाळ ला दिली. 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला 
वर्षानुवर्षे शहर उत्तर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1990 मध्ये सर्वात प्रथम भाजपचे दिवंगत खासदार लिंगराज वल्याळ यांनी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडली आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. त्यानंतर विश्‍वनाथ चाकोते यांचा अपवाद वगळता या मतदारसंघात सातत्याने भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत. माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख हे सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्‍क्‍याने निवडून आले आहेत. 

"विजय चौका'ची पार्श्‍वभूमी 
विधानसभा असो वा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक. भाजपची शेवटची प्रचार सभा बाळीवेस चौकात होत असे. या ठिकाणी शेवटची सभा झाली की भाजपचा उमेदवार विजयी व्हायचा किंवा महापालिकेत जादा जागा भाजपला मिळायच्या. त्यामुळे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी या चौकाचे नामकरण "विजय चौक' असे केले. ही परंपरा अगदी 2012 च्या महापालिका निवडणुकीपर्यंत कायम होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांची महापालिका प्रचाराची शेवटची सभा या ठिकाणी झाली. यावेळी भाजपची सत्ता आली नाही, मात्र निर्णायक संख्येने नगरसेवक निवडून आले. याच चौकात आता कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज गुरुवारी सायंकाळी जल्लोष करणार आहेत. 

कॉंग्रेसही येणार परिघाबाहेर 
देशाची आणि राज्याची सत्ता गेल्यानंतर कॉंग्रेसची बहुतांश आंदोलने ही कॉंग्रेस भवनापुरती मर्यादित झाली होती. काही वेळा जल्लोषही याच ठिकाणी व्हायचा. मात्र ठाकरे यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही परिघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या या निर्णयाचे कॉंग्रेसप्रेमींतूनही स्वागत होत आहे. अन्यथा ठरलेले कार्यकर्ते, ठरलेला परिसर हेच दृश्‍य कॉंग्रेस भवनाच्या परिसरात दिसून येत होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress shivsena - ncp react in bjp strong asembly constituancy