कॉंग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी करू नये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची भाषा, म्हणजे एकप्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूकच आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाऊन पक्षाचे नुकसान करू नये, अशी कळकळीची विनंती या युवकांनी पत्राद्वारे केली आहे. 

संगमनेर : राज्यात सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसने शिवसेनेबरोबर आघाडी करू नये, अशी मागणी मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची भाषा, म्हणजे एकप्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूकच आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाऊन पक्षाचे नुकसान करू नये, अशी कळकळीची विनंती या युवकांनी पत्राद्वारे केली आहे. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 102व्या जयंतीचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्त्यांनी शहरातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी हे पत्र माध्यमांपुढे जाहीर केले. सोनिया गांधी यांना पाठविलेल्या या पत्रात युवकांनी म्हटले आहे, की देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत कॉंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ व पाठबळ देऊन मुस्लिम समाजाने पक्षाच्या धोरणांना नेहमीच पाठबळ दिले.

मुस्लिम समाज नेहमीच कॉंग्रेससोबत

देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले, तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत, तसेच यापूर्वी संगमनेर तालुक्‍यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने नेहमीच कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी केले आहे. शिवसेना-भाजपसारख्या जातीयवादी पक्षांचा व विचारांचा पराभव केला. ही वस्तुस्थिती पत्राद्वारे युवकांनी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 

शिवसेना जातीयवादी पक्ष

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार केला, तर संगमनेर तालुक्‍याने मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात व पक्षाचे इतर पदाधिकारी सत्तेसाठी थेट शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची भाषा करीत आहेत. कॉंग्रेसच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असून, पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मुस्लिम समाज पक्षापासून दूर जाईल, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे.

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नाराजी

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणजे मुस्लिम समाजाची एकप्रकारे फसवणूकच असल्याची भावना, या पत्रात नमूद केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress should not go with Shiv Sena