सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात एकत्र; फोटो व्हायरल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी योगायोगाने सोमवारी (ता. 15) दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही रंगल्या. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

अहमदनगर : नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी योगायोगाने सोमवारी (ता. 15) दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही रंगल्या. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

शिर्डी येथून सकाळी 10.30 वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही अनपेक्षितपणे शेजारी शेजारीच जागा मिळाली होती. अधिवेशनाची दोन दिवसांची सुट्टी संपल्यानंतर खासदार विखे पुन्हा दिल्लीला अधिवेशनासाठी निघाले होते. तर थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. दोघांनीही विविध विषयांवर चर्चाही केल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही नेमकी ही चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकले नाही.

दोघेही एकेकाळी काँग्रेसमध्ये होते़ विखे व थोरात यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी असल्यामुळे त्यांचे विविध मुद्यांवरुन नेहमी राजकीय वाद होते. राजकीय वर्चस्वावरुन दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील वाद राज्याला परिचित आहेत़ सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात कमळ फुलविण्याची घोषणा केली आहे. तर राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यात 12-0 करण्याची जबाबदारीही सुजय यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे विमानातील त्यांच्या या योगायोगाच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress state president Balasaheb Thorat and BJP MP Sujay Vikhe Patil in pne plane