Vidhan Sabha 2019 : युतीतील २१ मंत्र्यांकडून भ्रष्टाचार; बाळासाहेब थोरात यांचा आरोप

Vidhan Sabha 2019 : युतीतील २१ मंत्र्यांकडून भ्रष्टाचार; बाळासाहेब थोरात यांचा आरोप

वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. 

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार, आमदार विश्‍वजित कदम यांच्या प्रचारार्थ वांगी (ता. कडेगाव) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, विश्‍वजित कदम, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत व्यासपीठावर होते. सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी स्वागत केले.

श्री. थोरात म्हणाले, ‘‘भूलथापा मारून सत्तेत आलेल्या युतीने राज्याची फसवणूक केली. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार आणि सर्वसामान्य जनता प्रचंड आर्थिक दडपणाखाली आहे. पाच वर्षांत शेतमालाला हमीभाव नसल्याने १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वाचाळ मंत्र्यांना समाजमनाचे भान नाही. लोकशाही आणि संविधान धोक्‍यात असून, विरोधकांना संपविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर होत आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. आता आलेली संधी दवडू नका. या निवडणुकांत पतंगराव कदम यांची प्रचंड उणीव पक्षाला जाणवत आहे. त्यासाठी विश्‍वजित यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी आम्ही नेतोय. तुम्ही इथे विक्रमी मतांनी विजयी करण्याची जबाबदारी पार पाडा.’’

विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘या परिसराचे भाग्यविधाते पतंगराव कदम यांनी आपले आयुष्य वेचून या भागाचा कायापालट केला. ताकारी आणि टेंभूच्या माध्यमातून झालेले नंदनवन आणि आलेली अर्थक्रांती विरोधकही मान्य करतात. विविध संस्थांच्या उभारणीमधून हजारो लोकांना रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव देण्याची किमया साधली आहे. भविष्यातही हीच विकासगंगा अखंडित ठेवू.’’

सचिन सावंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील निवडणुकांत ३७० कलम हटविल्याचं तुणतुणं वाजवत भाजप-सेना युती मते मागत आहे. त्याचा येथे काय संबंध? सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजांवर बोला. राज्य पिछाडीवर गेले आहे. लोकांना इतर विषयांत गुंतविण्याचे पाप ते करत आहेत. कर्जाचा डोंगर वाढलाय. राज्य विकायला ते मागे राहणार नाहीत. जनतेशी प्रतारणा करणाऱ्यांना पायउतार करा.’’

पलूस राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारुती चव्हाण, राजकुँवर सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्ला चढविला.

‘सोनहिरा’चे संचालक रघुनाथ कदम, दिलीपराव सूर्यवंशी, मालन मोहिते, माजी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, ए. डी. पाटील, हिंमत देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, माजी सभापती भगवान वाघमोडे, शशिकांत माळी, राहुल साळुंखे उपस्थित होते. उपसरपंच बाबासो सूर्यवंशी यांनी आभार मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com