कॉंग्रेसचा बालेकिल्ला; पण भाजपचा दबदबा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मिरज तालुका कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, नेत्यांच्या पक्षांतर्गत कुरघोड्यांनी कॉंग्रेसला यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तोंडावर आपटावे लागले. जिल्हा परिषदेच्या 11 पैकी सात जागा आणि पंचायत समितीच्या 22 पैकी 11 जागा जिंकून भाजपने येथे दबदबा निर्माण केला. तेथे काठावरचे बहुमत असतानाही सभापती, उपसभापतिपदे मिळवली. मात्र, आता हे श्रेय कुणाचे, यावर आमदार-खासदारांत श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत. 

मिरजेचे सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुरेश खाडे हे या यशाचे थेट दावेदार आहेत. मग यापूर्वी त्यांची ताकद का दिसली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. पाच वर्षांपूर्वी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या ताकदीसमोर खाडेंची ताकद अपुरी पडे, हे वास्तव होते. परंतु, मदन पाटील यांच्या पश्‍चात त्यांचे कार्यकर्ते कुणाकडे जाणार ही उत्सुकता होती. कॉंग्रेस नेत्यांच्या अंतर्गत संघर्षात तालुक्‍यात सपाटून मार खावा लागला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे सर्वजण एकत्र येऊनही त्यांची डाळ शिजली नाही. यामध्ये जेवढा वाटा सुरेश खाडेंचा, तितकाच खासदार संजय पाटील यांचाही होता. त्यांचाही मिरज तालुक्‍यात मोठा संपर्क आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केले आहेत. आता मिरजेतील भाजपचे यश कुणाचे, यावर चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. 

उपसभापती निवडीत कुरघोडी 
मिरजेच्या सभापती, उपसभापती निवडीत भाजपमध्येच मोठे राजकारण झाले. सभापती आणि उपसभापती दोन्ही भाजपचे होण्याची संधी असताना व्हॉट्‌स ऍपवर सभापती भाजपचा आणि उपसभापती राष्ट्रवादीचा असा मेसेज फिरू लागला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने उपसभापतिपद पटकावणे हे त्यांचे मोठे यश ठरले असते. मात्र, ऐनवेळी भाजप नेत्यांत यावरून चर्चा झाली. एक गट राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्यात हट्टी होता; तर दुसऱ्या गटाने त्याला तीव्र विरोध केला. बहुमत होत असताना बाहेरचा सदस्य देण्यास नकार दिला. पक्षातीलच सदस्य देण्याचा आग्रह धरला; पण शब्द दिल्याने असे करता येणार नाही, असा हट्ट संबंधित नेत्याने धरला. त्याला विरोध करत पक्षाचाच सदस्य उपसभापती होणार, असा इशारा देत दुसऱ्या नेत्याने आपली ताकद दाखवली. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन सदस्य वगळता सर्व मते भाजपला पडली. 

Web Title: Congress stronghold But the BJP Pressure