काँग्रेसच्या मुसंडीने विरोधक घायाळ

मोहनराव कदम यांच्या विजयानंतर विश्‍वजित कदम भाववश झाले. काकांना ‘आमदार’ करण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.
मोहनराव कदम यांच्या विजयानंतर विश्‍वजित कदम भाववश झाले. काकांना ‘आमदार’ करण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.

सांगली - जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले. त्यातही पलूस, विटा नगरपालिका आणि कडेगावची नगरपंचायतीत त्यांची सत्ता आली; तर इस्लामपूर आणि खानापुरात ते सत्तेत वाटेकरी झाले आहेत. यामध्ये कदम गटाने मारलेली मुसंडी आश्‍चर्यचकित करणारी आहे. आधी विधान परिषद, नंतर बाजार समिती आणि आता पालिका निवडणुकीत पतंगराव कदम, विश्‍वजित कदम यांनी चुणूक दाखवत सत्ता हस्तगत केली. पण या सर्वात लक्ष वेधले ते विश्‍वजित कदम यांच्या कामगिरीने. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वांत त्यांचा दबदबा तयार झाला.

महिन्याभरापूर्वी विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांना उमेदवार जाहीर केले. त्यानंतर नगरसेवक शेखर माने यांनी 

 बंडखोरी केली. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या गटाचे ते प्रमुख होते. त्यांच्या बंडखोरीमागे विशाल पाटील असल्याचे स्पष्ट होते. त्यातच काँग्रेसचे दोन्ही जिल्ह्यात बळ कमी. त्यामुळे मोहनराव कदम यांना काँग्रेस पर्यायाने पतंगराव आणि विश्‍वजित हे कदम पिता-पुत्र कसे निवडून आणतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रामराजे निंबाळकर यांचे उमेदवार असलेले शेखर गोरे यांचा पराभव करण्यासाठी पतंगराव कदम आणि विश्‍वजित कदम यांनी सगळे कौशल्य पणाला लावले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने विशाल पाटील यांनी मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेतील उपमहापौर गट कदम यांच्या पाठीशी राहिला. या राजकीय घडामोडीत वेधून घेतले ते विश्‍वजित कदम यांच्या कामगिरीने. त्यांनी आपल्या चुलत्यास निवडून आणण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात प्रयत्न केले. आपली ताकद कमी आहे हे लक्षात घेऊन सर्व कौशल्य पणाला लावले. यात एक जिद्द होती ती दादांना (मोहनराव कदम) एकदा आमदार करायचेच याची. गेली ४५ वर्षे दादांनी पक्षासाठी काम केले. कार्यकर्त्यांसाठी निःस्पृह वृत्तीने काम केले. आपल्या पित्याच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांना आमदार करण्याच्या आलेल्या संधीचे विश्‍वजित यांनी जिद्दीने सोने करत यश मिळवले. प्रत्येक घडामोडीत आघाडीवर राहत त्यांनी जिल्ह्यातील मते तर मिळवलीच, पण सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीला खिंडार पाडले. त्यामुळे मोहनराव कदमांचा एकतर्फी विजय झाला.

विधान परिषदेपाठोपाठ दोनच दिवसांनी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी विशाल पाटील, अजितराव घोरपडे गटाला चारीमुंड्या चित करीत प्रशांत शेजाळ यांना सभापती केले. त्यातही त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. हे सर्व करत असताना नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. पलूस पालिका आणि कडेगाव नगरपंचायतीतही त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवत दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापण्यात मोठा वाटा उचलला.

या सर्व घडामोडीत एक गोष्ट प्रकर्षाने दिसली ती म्हणजे विश्‍वजित कदम यांनी राजकारण गांभीर्याने घेतल्याचे. पतंगराव कदम यांचा मुलगा म्हणून सर्व वारशाने मिळावे असे दिवस आता नाहीत हे लक्षात घेऊन त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व केले. वारसा असला तरी घरबसल्या सगळे मिळावे अशी समीकरणे आता राजकारणात चालत नाहीत, हे जळजळीत वास्तव त्यांनी जाणले आहे.

जि. प., पं. स. मध्ये संधी
काँग्रेसमध्ये आज पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, सदाशिवराव पाटील असे नेते आहेत. मात्र जिल्हा नेतृत्वाचा वारसा सोपवावा असे नव्या दमाचे नेतृत्व दिसत नाही. सत्यजित देशमुख, प्रतीक पाटील, विशाल पाटील, विश्‍वजित कदम अशी नावे असली तरी त्यातही या निवडणुकीत विश्‍वजित यांनी बाजी मारल्याचे दिसते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने जबाबदारी टाकायचे ठरवल्यास विश्‍वजित कदम यांना संधी मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com