कॉंग्रेसमध्ये "सर्जिकल स्ट्राइक' कधी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पडझडीवर आत्मचिंतन करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात "सर्जिकल स्ट्राइक' राबवत नेतृत्व बदलाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. तसेच विस्कटलेली पक्षाची घडी पुन्हा बसविताना जुन्या-नव्यांचा संगम करून पदाधिकारी नेमण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पडझडीवर आत्मचिंतन करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात "सर्जिकल स्ट्राइक' राबवत नेतृत्व बदलाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. तसेच विस्कटलेली पक्षाची घडी पुन्हा बसविताना जुन्या-नव्यांचा संगम करून पदाधिकारी नेमण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. 

सातारा जिल्हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर या बालेकिल्ल्याची सत्ता राष्ट्रवादीने हिसकावून घेतली. आता कॉंग्रेसच्या नंतर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तळगाळापर्यंत पाय रोवले आहेत. पण, गेल्या दहा वर्षांत कॉंग्रेसची जिल्ह्यातील ताकद यावेळच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पूर्ण लयाला गेल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या. निवडणुकीत मानहानी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणी काही ठिकाणी त्यांनी "राष्ट्रवादी'शी हातमिळवणी करूनही हातात काहीही पडले नाही. सध्या जिल्ह्यातील कॉंग्रेसची विविध शकले झाली आहेत. कऱ्हाडातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील हे जिल्ह्यातील कॉंग्रेसची सूत्रे हलवितात. परंतु, त्यांचे नेतृत्व अनेकांना मान्य नाही. कॉंग्रेसचा प्रत्येक तालुक्‍यात मजबूत गट असला तरी या गटांत एकीचा अभाव आहे. वाईत ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मदन भोसले, कोरेगावात ऍड. विजयराव कणसे, भीमराव पाटील, किरण बर्गे, माण तालुक्‍यात आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते, खटावमध्ये अशोक गोडसे, सुरेश जाधव, धैर्यशील कदम, तर फलटणमध्ये हिंदूराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, पाटणमध्ये हिंदूराव पाटील तर साताऱ्यात रजनी पवार, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक, रवींद्र झुटिंग असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तालुकानिहाय जाळे आहे. पण, यांच्यात एकमेकांचे कोणत्या ना कोणत्या कारणांनी मतभेद आहेत. यातूनच कॉंग्रेसची ताकद दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. याचा फटका नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसला आहे. या पडझडीतून पक्षाला सावरून पुन्हा पक्षाची नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी सर्व तालुक्‍यांतील प्रमुख नेत्यांवर आली आहे. पण, या सर्वांना नेतृत्व बदलाचे वेध लागले आहेत. तेच तेच पदाधिकारी नकोत, आता जुन्या- नव्यांचा संगम करत पक्षश्रेष्ठींनी नेतृत्व बदल करावा आणि जिल्ह्यातील कॉंग्रेसला पुन्हा उभारी मिळवून देणाऱ्या नेतृत्वाच्या ताब्यात सर्व सूत्रे द्यावीत, अशी अपेक्षा कॉंग्रेसजन व्यक्त करत आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन संपल्यावर कॉंग्रेस पक्षश्रेंष्ठींकडून सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसजनांची मागणीची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांपर्यंत धाव 

काही कॉंग्रेसजनांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कानावर जिल्ह्यातील ही सर्व परिस्थिती घातली आहे. प्रसंगी श्री. चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कॉंग्रेसची पुनर्बांधणी होण्याची चिन्हे आहेत. पण, पक्षश्रेष्ठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दुखावणार नाहीत. त्यामुळे पुन्हा दुफळी होण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Congress surgical strike