स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच करणार आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

कोल्हापूर : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यात कॉंग्रेस समितीची नियोजित भेट आज होऊ शकली नाही; मात्र दोघांनी दूरध्वनीवर चर्चा केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढवण्याचे या चर्चेत ठरले. दरम्यान, भुदरगड व चंदगडमधील नेत्यांच्या अडचणी आज सतेज पाटील यांनी ऐकून घेतल्या. या वेळी आपापसातील मतभेद बाजुला ठेवून एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरले. गरज पडल्यास स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या मतानुसार आघाड्या करण्याचे ठरले.

पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील आज कॉंग्रेस समितीत भेटणार होते. जिल्ह्यांतील ज्या तालुक्‍यांमध्ये वाद आहेत, ते मिटविण्याबाबत त्यांच्यात चर्चा होणार होती. पी. एन. पाटील दुपारी बाराच्या सुमारास कॉंग्रेस समितीत आले. थोडा वेळ थांबून ते निघून गेले. त्यानंतर एक-दीडच्या सुमारास आमदार सतेज पाटील तेथे आले. त्यामुळे दोघांची भेट होऊ शकली नाही. भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिकडे जावे लागत असल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे दोघांनी नंतर दूरध्वनीवर चर्चा केली. आगामी निवडणुका ताकदीने लढण्याचे आणि काही तालुक्‍यांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून आघाडी करण्याचे चर्चेत ठरले. तालुका पातळीवरील नेत्यांना विश्‍वासात घेण्याचेही त्यांनी ठरविले. स्थानिक नेत्यांना डावलून तालुक्‍यात कोणतीही आघाडी होणार नाही किंवा परस्पर उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

त्यानंतर भुदरगड व चंदगड तालुक्‍यातून आलेले माजी आमदार बजरंग देसाई, भरमू सुबराव पाटील यांच्याशी आमदार सतेज पाटील यांनी चर्चा केली. देसाई यांनी दिनकर जाधव जर पक्षाचे चिन्ह घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले तर आपणही हाताच्या चिन्हावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत लढण्यास तयार असल्याचे सांगितल्याचे समजते. भरमू सुबराव पाटील यांनी आपण कॉंग्रेससोबत असल्याचे सांगितल्याचे कळते. या वेळी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीत सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील. तरी आपापसातील मतभेद विसरून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

आघाडीबाबत आज मुंबईत बैठक
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरविण्यासाठी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबत मते जाणून घेण्याकरिता प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईत उद्या (ता. 16) बैठक बोलाविली आहे. या बैठकीस कोल्हापुरातून पालक म्हणून नियुक्‍ती झालेले आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस ही बैठक चालणार आहे.

Web Title: congress thinking about alliance in kolhapur