काँग्रेस 'ती' चूक पुन्हा करणार नाही; सांगली लोकसभेसाठी नेते आक्रमक, NCP ला देणार शह? Loksabha Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Loksabha Election Congress

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पराभूत झाल्या, तेव्हाही सांगली काँग्रेसनेच जिंकली होती.

Loksabha Election : काँग्रेस 'ती' चूक पुन्हा करणार नाही; सांगली लोकसभेसाठी नेते आक्रमक, NCP ला देणार शह?

सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत (Sangli Loksabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढताना सांगली लोकसभा मतदार संघ काँग्रेसच (Congress) लढवेल. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा हा हक्काचा मतदार संघ अन्य पक्षाला सोडू नका, अशी आग्रही भूमिका जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली आहे.

आज (ता. ३) मुंबईत पक्षाची बैठक होणार आहे. त्यात हाच मुद्दा मांडला जाणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादीची नजर असून त्याला शह देण्यासाठी काँग्रेस नेते आक्रमक भूमिका घेणार आहेत.

काँग्रेसची कालपासून मुंबईत (Mumbai) लोकसभा आढावा बैठक सुरू झाली आहे. त्यात राज्यातील सर्वच मतदार संघांतील स्थितीचा आढावा घेतला जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित असणार आहेत.

जिल्ह्यातील आमदार विश्‍वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. उद्या सांगली लोकसभा मतदार संघावर खल होणार आहे. त्यात सांगली काँग्रेसकडेच राहिली पाहिजे, अशी भूमिका मांडली जाईल. हा आमचा हक्काचा गड आहे, तो आम्ही लढू आणि जिंकू, असे मत जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले.

सांगली लोकसभा मतदार संघ २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पराभूत झाल्या, तेव्हाही सांगली काँग्रेसनेच जिंकली होती. २०१४ ला मात्र मोदी लाटेत काँग्रेसचा अडीच लाख मतांनी पराभव करत भाजपने बालेकिल्ला उद्‍ध्वस्त केला. २०१९ ला काँग्रेसला उमेदवारच ठरवता आला नाही आणि संधीचा फायदा घेत आघाडीतील काही नेत्यांनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गळ्यात घातली.

राजकीय कोंडी झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून लढण्याची वेळ आली. काँग्रेसची नेमकी तीच चूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते. सांगली मतदार संघावर ते दावा करणार, हे नक्की आहे. काँग्रेसच्या तुलनेत आमची ताकद अधिक आहे, असा दावा राष्ट्रवादी करू शकतो.

उमेदवार ठरवणार का?

२०१९ ला काँग्रेसला उमेदवारच ठरवता आला नाही आणि हातची जागा सोडावी लागली. २०२४ साठी सांगली मागताना उमेदवार कोण, हे आधी ठरवा, अशी भूमिका वरिष्ठ नेते मांडू शकतात. अशावेळी सांगलीकरांची एकजूट दिसणार का? विशाल पाटील यांच्या नावावर एकमत होणार की काँग्रेस नवा चेहरा पुढे आणणार, हाही मुद्दा लक्षवेधी असेल.