काँग्रेससमोर विधानसभेचे 'अग्निदिव्य'

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 12 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ-जवळ येत आहेत, तस तसे कॉंग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. वर्षानुवर्षे कॉंग्रेसकडून सत्ता भोगलेले नेत्यांचे कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही कॉंग्रेससाठी "अग्निदिव्य' असेल. 

सोलापूर : विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ-जवळ येत आहेत, तस तसे कॉंग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. वर्षानुवर्षे कॉंग्रेसकडून सत्ता भोगलेले नेत्यांचे कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही कॉंग्रेससाठी "अग्निदिव्य' असेल. 

एकेकाळी कॉंग्रेस म्हटलं की, सत्ता आणि सत्ता म्हटलं की काँग्रेस हे जणू समीकरणच झाले होते. मात्र नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि काँग्रेसची मजबूत सत्तास्थाने एक-एक करून ढासळू लागली. परिवर्तन हवे म्हणून सत्ता बदलली असे म्हणत कांग्रेसवाल्यांनी स्वतःचीच समजूत काढली. पण 2017 मध्येही मोदींचा करिष्मा चालला आणि पुन्हा भाजप सत्तेवर आला. हे कमी की काय म्हणून आता सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसची अस्तित्वात असलेली सत्तास्थाने ढासळू लागली. 

कॉंग्रेसचे सध्या तीन आमदार आहेत. त्यामध्ये प्रणिती शिंदे (शहर उत्तर), भारत भालके (पंढरपूर) आणि सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट) यांचा समावेश आहे. पैकी भालके आणि म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर फार मोठे बदल किंवा धक्के कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. हातात असलेली सत्तास्थाने तरी कायम रहावीत यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांना फार प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेश कॉंग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविले असताना प्रस्थापितांच्या मतदारसंघातूनही नवख्यांचे अर्ज आल्याने कॉंग्रेसमोरील आव्हाने वाढली आहेत. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आजी-माजी आमदार-खासदारांना पक्षात आणून भाजपची संख्या वाढविण्याची त्यांची योजना कमालीची यशस्वी झाली. 

निवडणुकीपूर्वी मोदी व भाजपच्या नावाने खडी फोडणारे आज मोदींचे स्तुतीपाठक झाले आहेत. त्यात सोलापूरही मागे नाही. लोकसभा निवडणुकीत शरीराने कांग्रेसमध्ये असले तरी मतदान भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रणिती शिंदे यांच्यासमोर आता भाजप-शिवसेनेबरोबरच एमआयएम-वंचितचे आव्हान मोठे आहे. कांग्रेसमधील फितुरी कायम राहिली तर हे तिन्ही मतदारसंघही काँग्रेसच्या हातून जाण्याचीच शक्‍यता जास्त आहे. प्रस्थापितांनी पक्ष सोडल्याने वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या तसेच एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळेल, पण त्यांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे फार अवघड असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress will face problem while assembly elections