आयारामांचा चिखलच भाजपला संपवेल...- विशाल पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सांगली - ‘‘काँग्रेसमधलाच सगळा चिखल भाजपमध्ये गेल्याने तिथे दुसरे काय होणार? एकमेकांवर चिखलफेकच होणार आहे. भाजपमधील हा आयारामांचा चिखलच भाजपला संपवेल,’’ अशी बोचरी टीका काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

सांगली - ‘‘काँग्रेसमधलाच सगळा चिखल भाजपमध्ये गेल्याने तिथे दुसरे काय होणार? एकमेकांवर चिखलफेकच होणार आहे. भाजपमधील हा आयारामांचा चिखलच भाजपला संपवेल,’’ अशी बोचरी टीका काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलण्यावरून भाजपमधील भूकंपावर भाष्य करताना त्यांनी ‘खासदार संजय पाटील यांना आता जिल्हाच्या नेतेपदाची स्वप्ने पडत असून त्यांची दादागिरी काँग्रेस खपवून घेणार नाही,’ असा इशाराही दिला. 

ते म्हणाले, ‘‘भाजपमध्येच अस्वस्थता दिसू लागली आहे. चिखलातून कमळ फुलवू असे भाजप नेते सांगत होते. उलट एकमेकांवर चिखलफेक करण्याची सुरुवात भाजपमध्ये लवकरच झाली आहे. भाजपचेच गोपीचंद पडळकर यांनी पक्षात लायकीचे नेते नसल्याचा हल्लाबोल करून तिथल्या नेत्यांची पात्रता दाखवून दिली आहे. शिस्तबद्ध पक्षाचे धिंडवडे निघत आहेत. विकासाच्या गप्पा मारून सत्तेत आलेल्या भाजपकडून भविष्यात भ्रमनिरास होणार आहे. जे जिल्हा परिषदेत घडले ते भविष्यात महापालिकेतही घडेल.’’

ते म्हणाले, ‘‘महापालिकेला फ्रेश चेहरे दिले असते तर आज सत्ता असती. लोकांत ठाण मांडणाऱ्यांना नाकारले. त्यातून धडा घेत तरुणांना अधिक संधी द्या. काँग्रेसने पुन्हा विश्‍वास मिळवण्यासाठी विरोधक म्हणून चांगले काम केले पाहिजे.

वसंतदादा कारखान्याच्या करारावर टीका करणाऱ्यांना पोटतिडीक आहे. त्यांना बघवत नाही. शहराचे आणि परिसराचे अर्थकारण नव्याने सुरू झाले आहे. ते विसरून वसंतदादा घराण्याला हेतूपूर्वक टार्गेट केले जातेय. जिल्हा बॅंकेकडून काहींना मर्यादा ओलांडून २०० ते ४०० कोटींची कर्जे दिल्याकडे दुर्लक्ष केले जाते. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांचीच कर्जे थकीत आहेत.’’

विधानसभेला मी इच्छुक 
लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर ते म्हणाले, ‘‘अजून याबाबत पक्षाचे धोरण ठरलेले नाही. मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. पण पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती सर्वजण पार पाडू. काँग्रेसचे दिग्गज नेते आता हयात नसल्याने संजयकाकांना नेतेपदाची स्वप्ने पडू लागली असली तरी त्यांची दादागिरी काँग्रेस सहन करणार नाही. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते ठिकठिकाणी दादागिरी करत आहेत. त्यांच्या दादागिरीला जशास तसे उत्तर यापुढे दिले जाईल.’’

Web Title: congress youth leader Vishal Patil Comment