घटनेच्या प्रस्तावनेचा ‘आरटीओ’मध्ये फलक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सातारा - संपूर्ण देशाचा कारभार राज्यघटनेच्या तत्त्वांना आधारभूत मानून चालतो. त्या उद्देशांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फलक लावण्यात आला आहे.

सातारा - संपूर्ण देशाचा कारभार राज्यघटनेच्या तत्त्वांना आधारभूत मानून चालतो. त्या उद्देशांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फलक लावण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व प्रयत्नांतून संपूर्ण जगात आदर्शवत अशी भारतीय राज्यघटना तयार झाली. भारतीय जनतेने कोणत्या मूल्यांवर आधारित राष्ट्राची निर्मिती करायला पाहिजे, हे राज्यघटनेतून सर्वांना समजते. राष्ट्राचा उद्देश व नीतीमूल्ये ही राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये देण्यात आली आहेत. मात्र, संपूर्ण देशाचा कारभार ज्याला आधारभूत मानून चालतो, त्या राज्य घटनेविषयी बहुतांश जणांना फारशी माहिती नसते. त्याची सर्वसामान्य नागरिकांना व प्रामुख्याने युवकांना माहिती होणे अत्यंत आवश्‍यक आहे. राज्य घटनेच्या उद्दिष्टांची माहिती होण्यासाठी तिची प्रस्तावना सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी लावली जावी, ही कल्पना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांना आली. त्यातून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक परवाना काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हॉलमध्ये दर्शनी अशा ठिकाणी घटना फलक लावण्याचा निर्णय घेतला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साताऱ्यात काही वर्षे वास्तव्य होते. त्यांनी साताऱ्यातूनच शिक्षणाला सुरवात केली. त्यांच्या मातोश्रींचे निधनही साताऱ्यात झाले.  त्यामुळे साताऱ्याशी त्यांचे भावनिक व जैविक ऋणानुबंध होते. याच साताऱ्यात शासकीय कार्यालयांमध्ये असा घटना फलक लावण्याचे काम श्री. धायगुडे यांनी केले. 
उद्या (शुक्रवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते आज या घटना फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

‘‘उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने युवक-युवती येत असतात. हा घटना फलक त्यांना नेहमीच सक्षम राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देत राहील.’’ 
-संजय धायगुडे 

Web Title: Constitution of RTO panel