कष्टकऱ्यांचा सन्मान अद्यापही दूरवरच!

Construction-Employee
Construction-Employee

सातारा - इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नांसाठी तब्बल २३ वर्षांपूर्वी कायदा झाला. मात्र, अद्यापही कामगार विविध योजनांपासून कोसो दूर आहेत. एवढेच नाही, तर शासकीय उदासिनतेने हजारो कामगारांची अद्याप नोंदणीही होत नसल्याचे वास्तव आहे. सातारा जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत तीन हजार ३८६ कामगारांची नोंदणी जीवित आहे. हजारो कामगारांची नोंदणी या मंडळात झाली नसल्याने त्यांच्या कष्टाचा शासनस्तरावर सन्मान होताना दिसत नाही.

बांधकाम कामगार हे असंघटित क्षेत्रात मोडतात. त्यांच्यासाठी एक मार्च १९९६ रोजी कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर एक मे २०११ रोजी ‘इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्यात आले. नंतर कामगारांच्या नोंदणीला प्रारंभ झाला. अनेक वर्षांपासून बांधकाम कामगारांच्या नोंदणीचीच मोठी वाताहत आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत चार हजार ७२२ कामगारांची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयात झाली. त्यापैकी तीन हजार ३८६ कामगारांची नोंदणी जीवित आहे. मात्र, प्रत्यक्षात नोंदणी न झालेल्या कामगारांची संख्या लाखापेक्षा अधिक असण्याची शक्‍यता आहे.

‘सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा’ हे वाक्‍य घेऊन पुढे चाललेल्या मंडळाला खरोखर कष्टाचा सन्मान करण्यासाठी व्यापक प्रमाणात नोंदणी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बांधकाम मजुरांची लाभार्थी म्हणून नोंदणी करणे, त्यांना ओळखपत्र देणे, इमारत कामगारांचे अंशदान एकत्र करणे, लाभार्थींसाठी योजना कार्यान्वित करणे हे मुख्य कामकाज आहे. इमारतीसाठी खोदकाम सुरू होऊन ते पूर्णत्वाला जाईपर्यंत दगड फोडणारे, सुतार, रंगारी, काचेचे वस्तू बनविणारे, सेंट्रिंग काम करणारे, गवंडी, फ्लंबर, वायरमन आदी १९ प्रकारच्या कामगारांचा यामध्ये समावेश होत असल्याचे कामगार कार्यालयातून सांगण्यात आले. 

नोंदणी शुल्क अत्यंत कमी
नोंदणीसाठी गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकारातील तीन छायाचित्रे, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बॅंक पासबुकची सत्यप्रत आवश्‍यक आहे. संबंधित कंत्राटदार, शासकीय कंत्राटदार अथवा गावस्तरावर ग्रामसेवकांचा दाखला यासाठी बंधनकारक आहे. नोंदणी शुल्क २५ रुपये असून, पाच वर्षांसाठी ६० रुपये वर्गणी भरल्यास मंडळाचे लाभ मिळतात. 

...हे आहेत योजनेचे लाभ
 कामगारांना पाच लाखांचा अपघात विमा 
 गंभीर आजारासाठी दोन लाखांची मदत 
 पाल्य, पत्नीस शिक्षणासाठी आर्थिक मदत 
 मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रोत्साहनपर मदत 
 वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत 
 कामगारांना साहित्य खरेदीसाठी मदत 
 प्रथम विवाहासाठी तीन हजारांची मदत
 घरासाठी भरीव आर्थिक साह्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com