बेळगाव जिल्ह्यातील 65 हजार बांधकाम कामगारांना मदतीची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

बेळगाव जिल्ह्यातील 17 हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र अद्यापही 65 हजार कामगार आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने या कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. 

बेळगावः जिल्ह्यातील 17 हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र अद्यापही 65 हजार कामगार आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने या कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. 
जिल्ह्यात 80 हजार बांधकाम कामगार असून त्यापैकी 17,285 कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांप्रमाणे भरपाई मिळाली आहे. एप्रिल महिन्यांत पहिल्यांदा दोन हजाराची मदत जाहीर केली. या दरम्यानच मुख्यमंत्र्यांनी श्रमजीवींसाठी विशेष घोषणा करत आणखी तीन हजार रुपयांची मदत वाढवली. यानुसार पहिल्या टप्प्यात 17 हजार बांधकाम कामगारांच्या थेट खात्यावर पाच हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, उर्वरित कामगार अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लॉकडाउन 3.0 दरम्यान राज्यातील श्रमजीवींसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. बांधकाम कामगार, फूल विक्रेते, धोबी, सलून, कार व ट्रक्‍सी चालकांसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली; पण जिल्ह्यातील अजून 75 टक्के बांधकाम कामगार आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. उर्वरित घटकांनाही मदत मिळालेली नाही. सध्या परिस्थिती बिकट असून या घटकांना पैशाची नितांत गरज आहे. यामुळे नियोजित वेळेत मदत मिळणे अपेक्षित असताना शासनाची वेळकाढू भूमिका श्रमजीवींच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया कामगार संघटनेतून व्यक्‍त होत आहे. 

जिल्ह्यात 17 हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. उर्वरित कामगार मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, यासंदर्भात शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या असल्यामुळे कामगारांना लवकरच मदत मिळू शकेल. 
-ऍड. एन. आर. लातूर, अध्यक्ष, जिल्हा बांधकाम कामगार संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction workers in Belgaum district are waiting for help