कोल्हापूर : घाटात सातशे फूट दरीच्या टोकावर अडकला कंटेनर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कंटेनर अडकलेल्या टोकावरून दरीची उंची सुमारे ७०० फूट आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कंटेनरची पुढील दोन चाके दरीच्या बाजुला झुकलेली होती आणि कंटनेरच्या केबिनमध्ये काही काळ चालक जीव मुठीत धरून बसला होता.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : कोल्हापूर जिल्ह्याला गोवा आणि सिंधुदुर्गाशी जोडणाऱ्या करुळ घाटात एक कंटेनर संरक्षक कठड्यावर अडकल्यामुळे भीषण अपघात टळला आहे. घाटाच्या वळणावर कंटेनरचा फोटो पाहूनच काळजात धस्स होत आहे.

कंटेनर अडकलेल्या टोकावरून दरीची उंची सुमारे ७०० फूट आहे. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कंटेनरची पुढील दोन चाके दरीच्या बाजुला झुकलेली होती आणि कंटनेरच्या केबिनमध्ये काही काळ चालक जीव मुठीत धरून बसला होता. पोलिसांनी तारेवरची कसरत करीत त्याचा जीव वाचविला आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला तळ कोकण आणि गोव्याशी जोडणारा हा महामार्ग आहे. अपघातग्रस्त कंटेनर (एचआर ५५ : एम ५९४९) हरियाणाचा असून तो पुण्याहून गोव्याकडे जात होता.

कंटेनरला अपघात झाल्याचे कळताच करूळ चेकपोस्टवरील पोलिस कर्मचारी संदीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इतर वाहन चालकांच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. घाटात टोकावर अडकलेल्या कंटेरनचा फोटो पाहून त्या चालकापुढं साक्षात मृत्यूच उभा असल्याचं दिसत होतं. पण, या परिस्थितही कंटेनर चालकाने धीर सोडला नाही. मोठ्या कसरतीने पोलिसांनी इतर वाहनचालकांच्या मदतीने त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. पण, बाहेर काढल्यानंतर भयभीत झालेल्या त्या ड्रायव्हरची तब्येत बिघडली होती. पोलिसांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी अपघातस्थळी भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: container stuck in 700 hundred feet vally in kolhapur district sindhudurg