esakal | कोरोना निर्बंधांचा प्रवास एक किलोमीटर ते एक फूट; बेफिकीरी मात्र तेवढीच
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना निर्बंधांचा प्रवास एक किलोमीटर ते एक फूट; बेफिकीरी मात्र तेवढीच

कोरोना निर्बंधांचा प्रवास एक किलोमीटर ते एक फूट; बेफिकीरी मात्र तेवढीच

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : विजयनगर चौकातील एका बॅंक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. जिल्ह्यात कोरोनाचा तो पहिला बळी ठरला. त्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागली आणि विश्रामबाग चौक ते मिरजेतील रेल्वे पुलापर्यंत आणि हसनी आश्रम ते कुपवाड चौकापर्यंतचा भाग सीलबंद केला गेला. सांगली-मिरजेला जोडणारा रस्ता बंद झाला. कंटेन्मेंट झोन म्हणून एक किलोमीटरचा भाग बांबू, पत्रे, बॅरिकेड्‌स लावून रोखला गेला. त्याला वर्ष झाले. आता कुणाला कोरोना झाला; तर त्याच्या घरावर एक फुटाचा एक बोर्ड लावला जातो. वर्षभरात कोरोना निर्बंधांचा प्रवास एक किलोमीटर ते एक फूट असा झाला. निर्बंध कमी झाले आहेत, जगण्याला मोकळीक मिळाली. तरीही लोक बेफिकीर आहेत. गेल्या वर्षीएवढी ना काळजी आहे, ना तेवढी धास्ती...

रुग्णांचे आकडे पुन्हा रोज एक हजारात गेले आहेत. कधी 14, तर कधी 17 लोकांचा रोज बळी जातोय. अडीच हजार बेड तयार आहेत, मात्र ते कमी पडणार आहेत. सहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन शिल्लक आहेत, मात्र आठवडाभरानंतर तुटवडा निर्माण होईल, अशी स्थिती आहे. ऑक्‍सिजनचा तुटवडा भासणार, हे आधीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाने रंगही बदलला आहे. आधी ज्येष्ठांना तो झाला तर बचावण्याची शक्‍यता कमी, असे सांगितले जात होते. आता पुणे, मुंबईसह देशात आणि जगात तरुणांचाही त्याने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील दोन तरुण पुण्यात दगावले. सध्या लसीकरणाचा वेग वाढवून लोकांनी सावधगिरी बाळगली आहे, मात्र जागोजागी दिसणारी बेफिकिरी धक्कादायक आहे. लॉकडाउन नको होता, तो झाला नाही, निर्बंध आले, मात्र त्यांनाही केराची टोपली दाखवली जात आहे.

गेल्या वर्षी कोरोना आला तेव्हा एक रुग्ण सापडला, की भोवतालचा एक किलोमीटरचा परिसर सीलबंद केला जात होता. एकवेळ अशी होती, की शहरातील खुल्या भागापेक्षा निर्बंध लावलेला भाग अधिक झाला होता. त्यासाठी महापालिकेने एक-दोन नव्हे तर तब्बल अडीच कोटी रुपयांचा खर्च पत्रे बडवण्यासाठी केला होता. आता तो खर्च केवळ 25 रुपयांवर आला आहे. एक बाय एक फुटाचे एक डिजिटल छापले की काम झाले. कोरोनाबाधित घरातील व्यक्तींनी नियम पाळावेत, घरातून बाहेर पडू नये, इथंपर्यंत हे निर्बंध शिथिल झाले आहेत. ना शेजाऱ्यांना त्रास, ना बांबू बांधून नाकाबंदी, ना मानसिक त्रास, ना रस्त्यावर दिसताक्षणी काठीने बडवून काढण्याचा शारीरिक त्रास. तरीही, लोकांना हे निर्बंध जाचक का वाटावेत? या संकटाची भीती का वाटू नये? मृत्यूचे आकडे वाढत असताना बेफिकिरी का वाढावी, असे अनेक प्रश्‍न आहेत.

पुन्हा चक्रव्यूह हवाय?

हे संकट वाढत गेले, तर पुन्हा एकदा निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात, याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. लॉकडाउन कडक केला, तर घरातून बाहेर पडण्यालाही बंधने येतील. रस्त्यावर पोलिस अडवून काठी फुटेपर्यंत मारतात, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सध्या कारवाई सौम्य आहे. पोलिस विनंती करताहेत. त्यामुळे पुन्हा एक किलोमीटरसारखा निर्बंध लादून घ्यायचा, पुन्हा पत्र्याच्या चक्रव्यूहात अडकायचे, पुन्हा मार खायचा आहे की या स्थितीत सांभाळून राहायचे, हे लोकांनी ठरविण्याची गरज आहे.