कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

कोल्हापूर - कर्मचारी रोजंदारी पद्धत सुरू करा, ठेकेदार पद्धत रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आज बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासमोर ४०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. 

कोल्हापूर - कर्मचारी रोजंदारी पद्धत सुरू करा, ठेकेदार पद्धत रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आज बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासमोर ४०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. 

३२ हजार कंत्राटी कामगार रोजंदारी कामगार पद्धतीच्या मागणीसाठी लढा देत आहेत. राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या तिसऱ्या अधिवेशनात कंत्राटी कामगार कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवली पाहिजे, असा ठराव केला होता. यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष समिती तयार केली होती. यात मनोज रानडे यांनी याबाबतचा सकारात्मक अहवाल ऊर्जा विभागाकडे दिला आहे. रानडे समितीमधील सर्व सदस्यांचे रोजंदारी कामगार पद्धतीवर एकमत झाले आहे. आता मात्र शासनाकडून आर्थिक बोजाचे कारण देत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील २२ हजार कंत्राटी कामगारांच्या मनात असंतोष आहे. धोकादायक वीज उद्योगात कंत्राटी कामगारांनी महाराष्ट्राच्या जनतेची तसेच वीज उद्योगाची दहा ते वीस वर्षे कमी वेतनात सेवा केली आहे. अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीवर कामगार नेमून शासनाने आजवर करोडो रुपये वाचवले आहेत. 

महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांनी आजही दरमहा ८५०० ते ९००० हजार रुपये वेतन मिळणे अपेक्षित असताना त्यांच्या वेतनाच्या व भविष्य निर्वाह निधीच्या रकमेत दर महिना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने चालू असलेला हा भ्रष्टाचार तत्काळ थांबवून कंत्राटी कामगारांच्या कल्याणावर भर दिला पाहिजे. 
दरम्यान, उद्याही मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार आंदोलन करतील. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे विभागीय अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, कोषाध्यक्ष मधुकर माळी, सचिव अमर लोहार यांनी सांगितले. 
 

लढा चालू ठेवणार
मागण्या मान्य होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा कामगारांचा निर्धार आहे. उद्या ५०० हून अधिक कर्मचारी धरणे आंदोलन करतील. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहील, असा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला.

Web Title: contract electricity employee work close agitation