उदयनराजेंना आवरा; अन्यथा पक्ष सोडू 

उदयनराजेंना आवरा; अन्यथा पक्ष सोडू 

फलटण - जिल्ह्यात कुणाचीही दहशत असली, तरी मी घाबरत नाही. जोवर जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर तीन चक्रम आहेत, तोवर मीही तितकाच कठोर राहणार आहे, असे सांगत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर याहीपेक्षा खालच्या स्तरावर जाऊन जहरी टीका केली. तुम्हाला तुमचा खासदार सांभाळायचा असेल, तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवा; अन्यथा आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षनेतृत्वाला दिला. 

नीरा-देवघर प्रकल्पातून बारामतीला दिले जाणारे अतिरिक्त पाणी रोखल्यानंतर काल खासदार उदयनराजे भोसले आणि कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत रामराजेंवर खरपूस टीका केली होती. हे कसले भगीरथ, असा सवाल केला होता. त्याच्या आदल्याच दिवशी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामराजेंवर आरोप केले होते. सातारा जिल्ह्यातील पाणी बारामतीला देण्यामागे रामराजे यांचाच हात होता, असे सांगत या तिघांनीही आपले परंपरागत विरोधक असलेल्या रामराजेंना याकामी दोषी धरले होते. त्याला आज फलटणमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, तसेच पत्रकार परिषद घेऊन रामराजेंनी सडेतोड उत्तर दिले. 

ते म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत उद्या आमची बैठक आहे. या बैठकीत त्यांच्यासमोर आपण हा विषय मांडणार आहोत. तुम्हाला तुमचा खासदार सांभाळायचा असेल, तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवा; अन्यथा आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असे आपण स्पष्ट शब्दांमध्ये पवार साहेबांना सांगणार आहोत.'' 

ते म्हणाले, ""माझ्यावर जेवढी टीका होते, तेवढी जास्त एनर्जी मला मिळते. माझं मन शुध्द असून मी कुणालाही फसवलेलं नाही. उदयनराजे, आपण आपल्या दीड कोटीच्या गाडीतून खंडाळ्यात जो धोम- बलकवडीचा कालवा आहे, तेथून फलटण तालुक्‍यातील आंदरुडपर्यंत प्रवास करा, मग तुमच्या लक्षात येईल, की ज्या दुष्काळी भागास नीरा-देवघरच्या लिफ्टच्या योजना कधी मिळू शकत नव्हत्या, अशा गावांना कृष्णेचं पाणी दहा ते पंधरा बोगदे पाडून आणले आहे. त्यामुळे लोक मला भगीरथ म्हणत असतील. गेली पंधरा वर्षे मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असलो तर तुम्हाला त्याच एवढं दुःख का आहे? स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवता आणि जावळीत एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही केले नाहीत. फलटणमध्ये येऊन आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीची पिढी आमच्या आजोबांनी सांभाळलीय, याची नोंद मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ठेवा. कोणाविषयी व कोणाबरोबर बोलताय, याचे भान ठेवा.'' 

ते म्हणाले, ""उदयनराजे, जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे यापूर्वीही एकत्र होते. साताऱ्यात जे टेबलाखालून चालायचे ते टेबलावर आले, ते माझ्यामुळेच आले. मी घाबरेन असे कुणाला वाटत असेल तर ते शक्‍य नाही. पुनर्वसनाच्या जमिनींच्या बाबतचे माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा; अन्यथा जावळीतले आपण सगळे बाहेर काढणार आहोतच. तुमच्या ट्रस्टचे माझ्याकडे एक टन रेकॉर्ड आहे, हे ध्यानात ठेवा.'' 

रामराजे म्हणाले... 
- उदयनराजे यांनी एनआरबीसीचे किती प्रश्‍न उठविले व किती मोर्चे काढले? 
- दोन महिन्यांपूर्वी माझा उल्लेख गुरू म्हणून करणारे उदयनराजे निवडणुकीनंतर पुन्हा मूळ पदावर 
- त्यांचा पाणीप्रश्‍नाचा संबंध फक्त एकाच बाबतीत असून तेवढेच त्यांनी बोलावे 
- तुमच्यावरील केसेस खोट्या असतील तर ते न्यायालय ठरवेल 
- महसूल राज्यमंत्री असताना तुम्ही केलेले उद्योग जनतेसमोर येतील, तेव्हा तुम्हाला कुठं तोंड राहील? 
- लोकसभा निवडणुकीत जावळी व साताऱ्यातील मताधिक्‍य कमी झाल्याचा हा सगळा राग आहे 
- राजकीय उद्दिष्टांपायी आमचा बळी देण्याचा प्रयत्न 

रामराजे यांची खंत..! 
सातारा जिल्ह्यात उदयनराजे, जयकुमार गोरे यांच्या विरोधात मी नेहमी ठामपणे उभा असतो. अन्यायाविरुद्ध मी एकटाच लढा देतोय. जिल्ह्यातील कुठला आमदार त्यांच्या विरुध्द बोलायला तयार आहे, हे मला सांगा, मग तो राष्ट्रवादीचा असो किंवा शिवसेनेचा असो, असा सवाल व्यक्त करीत रामराजे यांनी एक प्रकारे खंतच व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 
नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना नीरा-देवघरचे पाणी आता मिळणार नाही. आम्ही पाणी पाडून ठेऊ; परंतु तुम्हाला ते देणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे. फलटण व विजयदादांच्या अकलूजला पिण्याचे पाणी हे नीरा उजवा कालव्याने मिळते. त्यामुळे पुढील काळात फक्त भाटघरचेच पाणी दिले जाईल. नीरा-देवघरचे अतिरिक्त पाणी पिण्यासाठीही दिले जाणार नाही, अशी व्यवस्था खासदारांनी करून ठेवलीय. याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्‍नी सविस्तर चर्चा करणार असल्याचे रामराजे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com