कोथिंबिराला मिळाला विक्रमी भाव; पेंडीचा दर 20 रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

रानमेव्याची आवक वाढली
आठ दिवसापासून वळीव पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आजरा, चंदगड या परिसरातून येणाऱ्या रानमेव्याची आवक वाढली आहे. येथील गुणे पथवर करवंद, जाभूळ, काजू यांचा सकाळी घाऊक बाजार भरत आहे. ग्राहकांचा खरेदीकडे कल आहे.

गडहिंग्लज : येथील भाजी मंडईत उन्हाळ्यामुळे मागणीपेक्षा आवक घटल्याने कोथिंबिरीचा दर कडाडला आहे. दर आठवड्याच्या तुलनेत दुपट्टीने दर वाढला आहे. पेंडीचा दर वीस रुपयांवर पोचला होता. लग्नसराईमुळे फळभाज्यांना मागणी कायम आहे. फळ बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. सोयाबिनचे दर स्थिर आहेत. जनावरांच्या बाजारात बैलांची आवक अधिक आहे.

दोन महिन्यापासून उन्हाळ्यामुळे पालेभाज्या आणि कोथिंबिरीची आवक रोडावली आहे. पंधरा दिवसांपासून तर भाज्या दुर्मिळ झाल्या आहेत. लग्नसराई असल्यामुळे कोथिंबिरीची मागणी अधिक आहे. तुलनेत आवक मात्र जेमतेम आहे. त्यामुळेच आज कोथिंबिरीच्या घाऊक बाजारात 500 रुपयांनी 100 पेंड्यांमागे वाढ झाली. 1500 रुपये 100 पेंड्या असा विक्रमी भाव कोथिंबिराला मिळाला. किरकोळ बाजारात 20 रुपये पेंडी अशी विक्री सुरु होती. जरळी (ता. गडहिंग्लज) येथील बाबू जाधव यांच्या लाल भाजीलाही 625 रुपये असा 100 पेंड्यांना दर मिळाला. कोबी, टोमॅटोची आवक टिकून आहे. दोडका, ढबू, भेंडी, कारली, काकडी या फळ भाज्यांना लग्नसराईमुळे मागणी वाढल्याचे भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. दहा किलोचे दर असे- कोबी 130, टोमॅटो 120, दोडका व ढबू 350, हिरवी मिरची 400, काकडी 300, भेंडी 250, कारली 400 रुपये.

फळ बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. कोकण परिसरासह स्थानिक आंब्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. लगतच्या कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक सुरु झाली आहे. कोकणातील हापूसचा दर 200 ते 350 रुपये असताना कर्नाटक हापूसचा दर मात्र 100 रुपये आहे. कर्नाटक हापूस आंबाही कोकणातील हापूससारखा दिसत असल्याने ग्राहकांची विक्रेत्यांकडून फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. तोतापुरी आंब्याची आवकही सुरु झाली आहे. ग्रामीण भागातून स्थानिक पायरी, हापूस आंब्याची आवक चांगली आहे. पायरीचे दर 150 ते 200 रुपये डझन असा आहे.
सोयाबिनचा दर स्थिर आहे. मात्र, सोयाबिन उत्पादक उद्यापही चांगल्या दराच्या प्रतीक्षेत आहे. भुईमुगाला चांगला दर असला तरी उत्पादन कमी असल्याने आवक थांबली आहे. पुढील आठवड्यापासून उन्हाळी मक्‍क्‍याची आवक सुरु होण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. जनावरांच्या आठवडा बाजारात बैलांची आवक अधिक आहे. तुलनेत म्हशींची आवक कमी झाली आहे. परिसरात यात्रा सुरु असल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात तेजी टिकून आहे. तीन ते 15 हजारापर्यंत बकऱ्यांचे दर आहेत.

Web Title: coriander gets record price