खोल समुद्र अन्‌ कोरोनाची धास्ती 

manoj vaze
manoj vaze

सांगली ः कोरोना विषाणूच्या साथीची माहिती समोर आली तेंव्हा आम्ही मुंबईपासून 250 किलोमीटर आत समुद्रात होतो. 22 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मनात चिंता दाटली. ती चिंता आमच्या कुटुंबाप्रती होती.

ते सुरक्षित असतील का, नसतील तर आपण तिथे कसे जाऊ, किती काळ जहाजावर रहावे लागणार, या प्रश्‍नांची उत्तरे नव्हती. हा संकटाचा काळ आम्ही धैर्याने तोंड देत काढला आणि अखेर मी सांगलीत पोहचलो. आजही काही हजार लोक जहाजावर अकडून पडलेत, त्यांना गावी जायचे आहे... सिंगापूर येथे मरीन इंजिनिअरिंगमध्ये मुख्य अभियंता पदावर असलेले मूळचे सांगलीचे मनोज वझे "सकाळ'शी बोलताना थरारक अनुभव कथन करत होते. 


सुमारे 10 व्यापारी जहाजांवर कार्यरत राहिलेल्यानंतर मनोज वझे गेली आठ-दहा वर्षे ओएनजीसीच्या बॉम्बे हाय प्रकल्पावर कार्यरत आहेत. तेल वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या खोल समुद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम ते करतात. सहा-सहा महिने समुद्रात असतात. कोरोनाची बातमी आली तेंव्हाही ते मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर समुद्रात होते. ते म्हणाले, ""जहाजावर कोरोनाविषयी बातमी कळाली. सॅटेलाईट टीव्हीवर ती पाहिली. त्यानंतर लगेच लॉकडाऊन झाला. आमचे जहाजाचे एक वेळापत्रक असते. दरमहा कुणी घरी जायचे, नवीन लोक कोण येणार, हे ठरलेले असते. एका क्षणात ते वेळापत्रक कोलमडले. देखभाल दुरुस्तीसाठी आवश्‍यक साहित्याचा पुरवठा थांबला. त्यामुळे पुढे आठच दिवस काम शक्‍य झाले. प्रोजेक्‍ट थांबवून आम्हाला नांगर टाकण्यासाठी परत मुंबई किनारी यावे लागेल.'' 


ते म्हणाले, ""कोरोनाची बातमी आधीच कळाली होती. जहाजावर आमच्यासोबत दोन अमेरिकन, काही डेन्मार्कचे लोक होते. त्यामुळे आधीपासून आम्हाला त्याची जाणीव झाली होती. 10 ते 15 मार्च दरम्यान ते लोक परतले. काही लोक अजून तेथे अडकून पडलेले आहेत. आम्हा कर्मचाऱ्यांनी काळजी होती ती कुटुंबाची. कुटुंब गावाकडे होते. त्यामुळे तिकडे काय स्थिती असेल, याची हुरहून होती. आत्मविश्‍वास गळू लागला होता. आम्ही परत येऊ शकत नव्हतो. एक प्रकारचा तणाव वाढत होता. आमचे खाणे-पिणे, पाणी वेळेवर यायचे, मात्र त्याची वाहतूक करणाऱ्या छोट्या जहाजांवरून कोरोना बाधित आला तर... त्यामुळे आम्हाला बाधा झाली तर... अनेक प्रश्‍न होते.'' 


ते म्हणाले, ""आमच्या जहाजात 85 लोक होते. प्रोजेक्‍ट बंद केल्यानंतर दुसऱ्या जहाजावर 50 लोक गेले. शेवटपर्यंत आम्ही 35 लोक एकत्र राहिलो. एप्रिल अखेरीस केंद्र सरकारने आम्हाला अत्यावश्‍यक सेवांमध्ये समाविष्ट करून गावी जाण्यासाठी आमची सोय केली. पास आले. पण, कोरोना टेस्ट कुठे करायची हे स्पष्ट नव्हते. मुंबई महापालिकेचे डॉक्‍टर येऊन स्वॅब घेऊन गेले. चार दिवसांनी रिपोर्ट आले. घराकडून वाहन पाठवले ेगेल. 2 मे रोजी मी सांगलीत आलो. आम्ही एप्रिल पूर्ण शीपवरच होतो. ते मुंबई किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर समुद्रात थांबले होते.'' 
 

परराज्यातले अडकून 

मुंबईत नांगर टाकून थांबलेल्या जहाजावर आजही परराज्यातील कर्मचारी अडकून पडले आहेत. परराज्यात जाणाऱ्यांची अडचण झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, डेहराडून, उत्तराखंड येथील लोक अजूनही तेथे अडकून पडले आहेत. त्यांची परत जाण्याची सोय केली जात असल्याचे श्री. वझे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com