परीक्षांचे धोरण ठरवताना कोरोनामुक्त वातावरणाला प्राधान्य द्यावे...

अजित झळके
Monday, 31 August 2020

विद्यापीठांनी अंतिम वर्षाची परीक्षा घेतली पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली आहे

विद्यापीठांनी अंतिम वर्षाची परीक्षा घेतली पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक तज्ज्ञ, समिती सदस्य, मानस तज्ज्ञांनीही परीक्षांचे स्वागत केले आहे. केवळ धोरण ठरवताना कोरोनामुक्त वातावरणाला प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. अर्थात, ही जबाबदारी जितकी विद्यापीठाची, त्यात्या महाविद्यालयांची आहेत, तितकीच किंबहुना जास्त विद्यार्थ्यांची असणार आहे. कारण, नियम पाळले तरच संकटापासून दूर राहता येणार आहे. 

काटेकोर पालन करून परीक्षा पार पाडाव्यात :
अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला हव्यात, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्या आता घ्याव्याच लागतील. त्या घेणे गरजेचेही होते. कारण, अंतिम वर्षाचा निकाल म्हणजे तुमची पदवी आणि ती गुणांसह असावी, हे महत्वाचे. अर्थात, केवळ परीक्षेने शंभर टक्के मुल्यमापन होत नाही, हे खरे असले तरी त्या पदवीला एक महत्व आहेच. त्यासाठी सोशल डिस्टन्स बाळगून परीक्षा घ्यावी. त्याचे काटेकोर नियोजन करावे. भले ही प्रक्रिया थोड लांब चालली तरी हरकत नाही, मात्र ती पूर्ण काळजी घेऊन पार पाडावी. एका महाविद्यालयात 500 क्षमता असेल तर तेथे 100 विद्यार्थी बसवा.

अमेरिकेसारख्या ठिकाणी ट्युटोरियल असतात. सतत तेथे मुल्यमापन होत असते. त्याला अंतिम परीक्षेएवढेच महत्व असते. समजा तेथे अंतिम परीक्षा घेतली नाही तरी काही फरक पडत नाही. आपल्याकडे पद्धत वेगळी आहे. त्यामुळे यावेळच्या परीक्षा ठरवताना थोडा वेगळा गुण पॅटर्न राबवला तरी हरकत नाही. परीक्षा किती गुणांची घ्यायचे, हे ठरवता येऊ शकेल. विज्ञान शाखांची प्रात्यक्षिक परीक्षाही सोशल डिस्टन्स राखून घेता येईल. 

- डॉ. बिराज खोलकुंबे, शिक्षणतज्ज्ञ, सांगली 

वास्तव स्विकारून चला :
सर्वोच्च न्यायालायचा हा निकाल आहे, त्यावर खल करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तो स्विकारून पुढे गेले पाहिजे. या परिस्थितीला सामोरे जाताना आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर आधी काटेकोरपणे काम करा. कुठल्याही परिस्थितीत मास्क काढू नका. गरजेनुसार सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टन्स कटाक्षाने पाळा. ग्लोस घालून पेपर लिहण्याचा सराव सुरू करा. कारण, ती आपल्याला सवय नाही. मास्क घालून तीन तास पेपरचा सराव करा. कितीही जवळचा मित्र आला तरी मास्क काढायचा नाही, याची मनाशी खूणगाठ बांधा. या परिस्थितीला भिडायलाच हवे. कोरोनाला शंभर टक्के टाळू शकणार नाही. नवीन नियम आत्मसाद करूनच पुढे जावे लागेल. या स्थितीत मानसिक दबाव येणारच आहे. काहीजणांना बिन परीक्षेचे सुटू असे वाटले असेल... पण वास्तव वेगळे आहे. सहजासहजी यशाचा आनंद नाही. त्यामुळे कष्टाने यशाचा आनंद घ्या. अभ्यासाला लागा. 
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानस तज्ज्ञ, सांगली 

परीक्षा ऑनलाईनही चालेल :
अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतिम मुल्यांकन झाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी लेखी स्वरुपात परीक्षाच हवी असे नाही. ऑनलाईन परीक्षा घेता येईल. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडे व्यवस्था आहे. अगदी आदेश आले तर पंधरा दिवसांत परीक्षा घेता येईल, अशी तयारी आहे. एका बैठकीत ही माहिती आम्हाला देण्यात आली होती. काही विद्यार्थी दुर्गम भागात राहतात, त्यांना मोबाईल रेंजची अडचण येईल, मात्र त्यांनी कॉलेजमध्ये येऊन ऑनलाईन परीक्षा दिली तरी चालू शकेल. त्यात काही अडचण असायची कारण नाही. कमी गुणांची परीक्षा घेता येईल. कमी वेळात ती पार पडेल. या संकटात "पदवी प्रमोटेड' हा शब्द असता कामा नये. अन्यथा विद्यार्थ्यांचेही नुकसान होईल. 
- संजय परमणे, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-free environment for policy of exams ...