बुडा कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला बाधा, कार्यालय केले सील....

मल्लिकार्जुन मुगळी
Tuesday, 21 July 2020

अशोकनगर येथील बुडा कार्यालय सील करण्यात आले आहे.

बेळगाव  : बेळगाव नगरविकास प्राधिकरणच्या (बुडा)सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अशोकनगर येथील बुडा कार्यालय सील करण्यात आले आहे.

बुडा कार्यालयाच्या इमारतीतच स्मार्ट सिटी योजनेचे मुख्य कार्यालय आहे. ते कार्यालयही आता काही दिवस बंद ठेवावे लागणार आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर विविध राज्यातून अनेकजण विमानातून बेळगावला आले. त्यांची नोंद ठेवणे, त्यांना क्वारन्टाईन करणे या कामांसाठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले. त्यात बुडाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांचा समावेश होता.

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये कोरोनाचा कहरच :आज आणखी २४ जणांना बाधा... -

त्यांना दररोज सांबरा विमानतळावर जाऊन सेवा बजावावी लागत होती. त्याठिकाणी त्यांचा कोरोना बधितांशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे. पण यामुळे बुडा कार्यालयातील त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या आठवड्यात बुडा आयुक्त व नगररचना अधिकाऱ्यांसह त्यांनी अनगोळ येथील निवासी योजनेसाठी आरक्षित जमिनीची पाहणी केली होती. अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांचा संपर्क आल्याची शक्यता आहे. त्या सर्वांना होमक्वारन्टाईन केले जाणार आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infiltrates Buda office interrupts assistant executive engineer sales office in belgaum