डॉक्‍टरांचा वेगळा आदर्श ; कोरोना बाधीताला स्वतःच्या गाडीतून दाखल केले रूग्णालयात

अजित झळके 
Thursday, 13 August 2020

चहूबाजूला हे घडत असताना विजयनगर नावाच्या एका छोट्या गावातील एका डॉक्‍टरने मात्र वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

सांगली : कुणाला कोरोना झालाय म्हटलं की लोक दूर पळतात. त्या घराला कुणीतरी येऊन पत्रे ठोकून जातो. जणू घर वाळीत टाकण्याचा प्रकार केला जातो. चहूबाजूला हे घडत असताना विजयनगर नावाच्या एका छोट्या गावातील एका डॉक्‍टरने मात्र वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या गावात एक कोरोना बाधित आढळला. त्याला रुग्णालयात न्यायला वेळेत रुग्णवाहिका मिळेना... अखेर या डॉक्‍टरने स्वतःची गाडी काढली आणि त्या रुग्णाला मिरजेतील रुग्णालयात नेवून भरती केले. डॉ. दीपक पाटील असे त्यांचे नाव. 

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांचे हे गाव. या गावात कोरोना बाधित सापडला. सहाजिकच, छोट्या गावात मोठी चर्चा सुरु झाली. काळजी घ्यायला हवी, सावध राहिलं पाहिजे, एकत्र जमलं नाही पाहिजे, इत्यादी. त्यात त्या बाधिताला वेळेत रुग्णालयात पोहचवण्याबाबत प्रयत्नही सुरु झाले, मात्र रुग्णवाहिका काही वेळेत येईना. अशावेळी फार वेळ केला आणि काही विपरीत घडले तर बरे नव्हे, असा विचार करून डॉ. दीपक पाटील यांनी स्वतःची संपूर्ण काळजी घेत त्या रुग्णाला आपल्या कारमध्ये घेतले आणि मिरजेतील रुग्णालयात नेवून दाखल केले. त्यानंतर त्यांनी कारची आणि स्वतःची पूर्ण काळजी घेतली, सॅनिटायझेशन केले. या प्रकाराचे गावातील साऱ्यांनीच कौतुक केले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या, ""संकट काळात अशा पद्धतीने कोरोनाग्रस्तांना सहकार्य करण्याचे एक वेगळे उदाहरण विजयनगरमध्ये घालून दिले आहे. सांगली जिल्हा आणि विजयनगर गाव लवकरच कोरोनामुक्त होईल.'' 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona rushed the victim to the hospital in her own car