कोरोनाचा धसका : सिगारेट खपाला 30 टक्के दणका

Corona shock: Cigarette sale decreased by 30 percent
Corona shock: Cigarette sale decreased by 30 percent

सांगली : जीवघेण्या सिगारेट विक्रीत देशात 30 टक्के घट झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील माहितीनुसार त्यामुळे 10 हजार कोटींचा फटका बसला आहे. मात्र त्यामुळे कोरोनाने कमकुवत होणाऱ्या अनेकांच्या फुप्फुसांना जीवदान मिळाले आहे. ही आपत्तीतील सुपत्ती म्हणता येईल. 

मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फीक्र को धुएँ मे उडाता चला गया... असे म्हणणारा देवानंद सर्व पिढ्यांचा आयकॉन ठरतो. दोन बोटांत सिगारेट पकडून हवेत धूर सोडत जाणारा तो हिरो म्हणजे आपणच, असे वाटायला लागते. हवेत उडालेला धूर आपल्या तणावाला घेऊन उडतो, अशा समजातून सिगारेटचे व्यसन जडते. सगळ्या चिंता, ताण-तणाव सिगारेटच्या धुरात फुंकून टाकल्याचा भास होतो. तो भासच सिगारेटच्या व्यवसायाला भरभराट देतो.

भारताची अवाढव्य तंबाखू आणि सिगारेट बाजारपेठ तेच दर्शवते. एका आर्थिक अहवालानुसार, सन 2019 मध्ये सिगारेटपासून मिळणारा देशाचा महसूल 34 हजार कोटींच्या घरात होता. 2018 ला तो 30 हजार कोटी, तर 2011 ला 15 हजार कोटी होता. लोकांची क्रयशक्ती वाढली तसा सिगारेटचा दरही वाढला आणि उलाढालही. त्यामुळे हे आकडे वर्षानुवर्षे दुप्पट होत गेले. 

कोरोनाने मात्र प्रथमच सिगारेट विक्रीला धक्का दिला आहे. टाळेबंदीत तंबाखू, गुटखा, सिगारेट खपावर परिणाम झाला. हा आजार थेट फुप्फुसाला भिडत असल्याने सिगारेटबद्दलची धास्ती वाढली.परिणामी विक्रीत 30 टक्‍क्‍यांची घट झाल्याचे दिसते. 

पानपट्यांवर ध्रुमपानातही घट

पान, तंबाखू, मावा, गुटख्यासह सिगारेट विक्रीत मोठी घट झाली आहे. सिगारेटची मागणी तर पुरती घसरली आहे. लोक आरोग्याबाबत सजग झाल्याचे सुचिन्ह आहे. शहरात सिगारेट विक्रीत सुमारे चाळीस टक्के घट झाली आहे. पानपट्यांवर ध्रुमपानातही घट झाली आहे.
- युसूफ जमादार, कार्याध्यक्ष, पानपट्टी असोसिएशन, सांगली 

सिगारेटपासून दूर राहणेच योग्य

ही सिगारेटमुक्तीची संधी आहे. कोरोनात फुप्फुस, हृदयावर विषाणूंचा थेट हल्ला होतो. सीओपीडी, दमा, क्रॉनिक ब्रोंकायटीस आजार असणाऱ्यांनी सिगारेटपासून दूर राहणेच योग्य.

- डॉ. अनिल मडके, श्‍वसनरोग तज्ज्ञ 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com