e
e

कोरोना रहावा इथे कायमचा मुक्कामाला !

लिबिया...उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मुस्लिम देश. दिवाळीत सूरबाण पडावेत असे एरवी इथे रोजच मिसाईल पडतात. एक दोन लोक रोजच मरतात. त्यामुळे मृत्यूची इथे भिती बाळगून जगताच येत नाही. मात्र कोरोनाने सारेच बदलले. गेले साठ दिवस या लोकांनी अशी टाळेबंदी पाळली आहे की ते हेच लोक का असा प्रश्‍न पडावा. मला तर वाटतेय की अशी शांतता इथे लाभणार असेल तर कोरोनाचा इथे कायमचा मुक्कामाला राहिला तरी चालेल !

माझं गाव मिरज तालुक्‍यातलं सिध्देवाडी. 2009 पासून मी इथल्या मसारा क्‍लिनिक ऍन्ड अत्तास्मी डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या हॉस्पिटलमध्ये एमआरआय वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतोय. आता भारतात यायचं आहे मात्र इथल्या टाळेबंदीमुळे मी इथे अडकून पडलोय. मात्र सध्याच्या कोरोना आपत्तीत या देशाचं झालेलं दर्शन अभुतपूर्व असंच. इथे युध्दजन्य परिस्थिती नेहमीच. ही कृपा अमेरिकेच्या राजकीय हस्तक्षेपाची. पेट्रोलमुळे या देशाला जन्मजात श्रीमंती लाभली आहे. मात्र त्या पैशानेच इथली शांतता कायमची ढळली आहे. पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले फैय्याज मुस्तफा अल सराज्‌ हे अमेरिका पुरस्कृत तर त्यांच्याविरोधात फिल्ड मार्शल बल्किम्झ हाफ्तर (बेंगाझी शहर) यांच्यात संघर्ष नेहमीचाच. मात्र सध्या तो थंडावला आहे. हीच कोरोनाची इष्टापत्ती. त्यात पुन्हा रमजानचा उपवासाचा महिना. सध्या इथले वातावरण खूपच शांत आणि चांगले आहे. कोरोना आपत्ती जणू इथे अभुतपूर्व अशी शांतता घेऊन आली आहे. जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटावी अशीच आहे.
ट्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. आफ्रिका खंडातील चौथा मोठा तर जगातील 17 व्या क्रमांकाचा देश. सुमारे 64 लाख लोकसंख्येचा हा देश. बहुतांशी जनता अरेबियन वंशाची. सारा देशच आयातीवर विसंबून. इंधन वगळता उत्पादन असं इथं काहीच नाही. त्यामुळे टाळेबंदीमुळे उद्योग व्यवसाय ठप्प व्हायचा प्रश्‍नच नाही. त्यात रमजानचा महिना. दिवसभर उपवास. त्यामुळे तर सध्या दिवसभर कोण बाहेर येतच नाही. सरकार श्रीमंत. लोकही श्रीमंत. आमच्यासारखे बाहेरून आलेल्यांनाच काय ती पैशाची चिंता. प्रचंड खनिज तेलाच्या साठ्यांमुळे इथले अर्थकारण मजबूत. लिबियाची अर्थव्यवस्था आफ्रिका खंडामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत लिबिया आफ्रिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे इथल्या लोकांना सध्या चिंता असलीच तर तर लॉकडाऊन संपल्यानंतर इथल्या युध्दजन्य स्थितीची.
कोरोना आपत्तीने इथल्या जनतेने सरकारचा आदेश अगदी मनापासून पाळला. आत्तापर्यंत देशात फक्त सत्तर रुग्ण आढळले आहेत. त्यातले तीनच मृत्यू. तेही वयोवृध्द आणि अनेक विकारांनी त्रस्त असलेले. बहुतेक सारे परदेशातून आलेले. आता 27 मे पर्यंत टाळेबंदी राहणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर वजाबाकीत गेलेत. तरीही इथल्या अर्थकारणाला अद्याप तरी धक्का बसलेला नाही. आज ना उद्या जगभर व्यवहार सुरुच राहतील. इंधनाचे दरही हळू हळू वाढतील. मात्र सध्या लिबिया अनुभवत असलेली शांतता मात्र पुढे राहील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे की काय ही टाळेबंदी आणि शांतता हवीहवीशी. ही कोरोनाची इष्टापत्तीच. त्यामुळे अशी शांतता लाभणारच असेल तर कोरोना इथे कायमचा मुक्कामाला राहिला तरी सर्वांना आनंदच होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com