बिळूरमध्ये आढळले सहा बाधित ..शिराळे खुर्द, कोकरूड, सांगली, शिंदेवाडीत प्रत्येकी एक रूग्ण 

सोमवार, 29 जून 2020

सांगली - जिल्ह्यात आज आणखी दहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बिळूर (ता. जत) येथे सहा, शिराळे खुर्द, कोकरूड (ता. शिराळा), शिंदेवाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि सांगलीतील सम्राट व्यायाम मंडळाजवळ एकाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आजअखेर बाधितांची संख्या 368 वर पोहोचली आहे. 

सांगली - जिल्ह्यात आज आणखी दहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बिळूर (ता. जत) येथे सहा, शिराळे खुर्द, कोकरूड (ता. शिराळा), शिंदेवाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि सांगलीतील सम्राट व्यायाम मंडळाजवळ एकाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आजअखेर बाधितांची संख्या 368 वर पोहोचली आहे. 

जत तालुक्‍यातील बिळूर येथे एकाच दिवसात सहा रूग्ण आढळल्यामुळे गावात तसेच तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 30 वर्षाचे दोघे, 31, 42 आणि 44 वर्षाची व्यक्ती तसेच 55 वर्षाची महिला यांचा त्यात समावेश आहे. बिळूरमध्ये शुक्रवारी (ता.26) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यापूर्वी गावात रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जत तालुक्‍याचा विचार केला तर बिळूर "हॉटस्पॉट' ठरले आहे. शिराळा येथे 42 वर्षाची महिला आणि सात वर्षाचे बालक यांनाही कोरोना झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण असलेल्या शिराळा तालुक्‍यात आज आणखी दोन रूग्ण आढळले. शिराळे खुर्द येथे 42 वर्षीय महिला व कोकरूड येथे सात वर्षाच्या बालकाला कोरोना झाला आहे. दोघेही संशयित होते. दोघांना मिरजेत उपचारास दाखल केले आहे. सांगलीत काही दिवसाचा खंड पडल्यानंतर पुन्हा कोरोनाबाधित आढळला. सिव्हीलमधील दोघा परिचारकांना कोरोना झाला आहे. सांगलीत सम्राट व्यायाम मंडळाजवळ दोघे राहत होते. या दोघांच्या संपर्कात आलेल्या आणखी एका परिचारकास कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली आहे. या परिचारकांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील 21 वर्षाच्या तरूणीस देखील कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले. आज दहा रूग्ण वाढल्यामुळे आजअखेरच्या रूग्णांची संख्या 368 वर पोहोचली आहे. सध्या 130 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी अमरापूर (ता. कडेगाव) येथील 68 वर्षाची महिला व्हेंटिलेटरवर आहे. बिळूर (ता. जत) येथील 75 वर्षाचा वृद्ध आणि वाघापूर (ता. तासगाव) येथील 22 वर्षाची महिला ऑक्‍सिजनवर आहे. 

जिल्ह्यातील चित्र 
सोमवारी आढळलेले बाधित- 10 
बाधितांची एकूण संख्या- 368 
कोरोनामुक्त झालेले - 226 
आजअखेर मृत रूग्ण- 12 
सध्या उपचार घेणारे - 130