कोरोना व्हायरस ः उद्या घरीच बसायचं, उगाच बोंबलत फिरायचं नाय! 

विनायक लांडे
शनिवार, 21 मार्च 2020

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 153 दुकानांवर आजअखेर कारवाई केली आहे. दुसऱ्यांदा ही दुकाने खुली आढळून आल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.

नगर ः ""जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, की त्यांनी उद्या (रविवारी) "जनता कर्फ्यू'चे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांनी घरी गप्प बसावे. निवडणुकीच्या काळात प्रशासन जनतेला "मते देण्यासाठी बाहेर पडा' असे आवाहन करते, त्या वेळी जास्त संख्येने कोणी बाहेर पडत नाही. कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी घरी बसा म्हटले, तर जनता बाहेर पडते, असा विरोधाभास दिसतो. जनतेने थोडे बांधिलकीचे भान बाळगावे, अन्यथा प्रशासनाला सक्तीने कारवाई करावी लागेल,'' असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ""शहरात बहुतांश ठिकाणी अजूनही लोक विनाकारण फिरताना दिसत आहेत. चौकाचौकात कट्ट्यावर बसताना आढळतात. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे जनतेने पालन करावे. लोकांनी प्रशासनाचा अंत पाहू नका, सक्तीची कारवाई करण्याची वेळ आणू देऊ नका. कोणतेही हॉटेल उघडण्याचा प्रयत्न करू नका. गरजूंसाठी सुरू केलेले शिवभोजन थाळी केंद्रही गर्दी टाळण्यासाठी तूर्त बंद करण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीत कोणताही पेट्रोल पंप बंद करण्यात येणार नाही. जिल्हावासीयांनो, एकजुटीने लढलो, तर आपण कोरोना विषाणूच्या प्रसाराला नक्कीच आळा घालू शकतो.'' 

कोरोना मीटर 
193 नमुने तपासणीसाठी पाठविले 
2 पॉझिटिव्ह 
147 निगेटिव्ह 
44 अहवाल येणे बाकी 
148 जण "होम क्वॉरंटाईन' 

मी होम क्वॉरंटाईन; मला भेटू नका 
""जिल्ह्यात 148 जणांना "होम क्वारंटाईन'मध्ये ठेवले आहे. होम क्वॉरंटाईनमध्ये असणाऱ्या लोकांनी कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाचा त्यांच्यावर वॉच राहणार आहे. होम क्वॉरंटाईनमधील व्यक्तींनी स्वतः होऊन सोशल मीडियावर आवाहन करा, की "मला होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कृपया मला भेटण्यासाठी कुणीही येऊ नये,'' असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले. 
 
अतिआत्मविश्‍वासू लोकांपासून वृद्धांना धोका 
""बहुतांश लोकांना मनात असे विचार येतात, की मला कोरोना विषाणूपासून काहीही धोका नाही. बिनदिक्कत समाजात वावरत असतात, अशा लोकांचा विचार पूर्णतः चुकीचा आहे. घरातील किंवा समाजातील ज्या वृद्ध व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना अशा अतिआत्मविश्‍वासू लोकांपासून धोका होऊ शकतो. त्यामुळे सावधानता पाळा, सर्वांची काळजी घ्या,'' असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले. 

153 दुकानांवर कारवाई 
""जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 153 दुकानांवर आजअखेर कारवाई केली आहे. दुसऱ्यांदा ही दुकाने खुली आढळून आल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 112 व 177 नुसार गैरवर्तन करून शांतता भंग करणाऱ्या 132 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. शहरात अकरा पोलिस पथके नेमली आहे,'' अशी माहिती पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus stay home tomorrow! १४८ Home Quarantine