दुष्काळाशी लढणाऱ्या बिळूरवर कोरोनाचा नांगर...गाव ठप्प झाल्याने द्राक्ष, दूध व्यवसायावर मोठे संकट 

bilur village.jpg
bilur village.jpg

जत (सांगली)-  दुष्काळी जत तालुक्‍यातील बिळूर हे गाव लढायला लागलं होतं. म्हैसाळ योजनंचं पाणी आल्यानं त्या लढ्याला बळ मिळू लागलं होतं. पावसाचं पाणी शिवारात साठवून थोडीफार शेती पिकवायची धडपड सुरू होती. दावणीला जनावरं आल्यानं दूध उत्पादन सुरू झालं होतं... या साऱ्यावर नांगर फिरावा, असं मोठं संकट या गावावर आलंय. कोरोना महामारीने गावात धडक दिलीय, तब्बल 50 रुग्ण येथे सापडले आहेत. या धक्‍क्‍यातून गावाने कसं सावरायचं, हे कोडं आहे. लोक लढवय्ये आहेत. ते लढताहेत. 

जतपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर बिळूर गाव. लोकसंख्या 12 हजारांहून अधिक. तसं मोठं गाव. कायम दुष्काळी. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारं. या गावानं आता कात टाकायला सुरवात केली होती. गाव उभं राहत होतं. गावात आणि परिसरात एक हजार एकरावर द्राक्षशेती फुलली आहे. शेतातून चांगला पैसा उभा राहत आहे. तरुण शेतकरी गावातच आपलं भवितव्य शोधतो आहे. आयुष्य खडतर होतं, ते आता हिरवंगार दिसू लागलं होतं. तोवर हे संकट कोसळलं. गेल्या 12 दिवसांत या गावात 50 रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण गाव कडकडीत बंद झाले. सर्व व्यवहार ठप्प आहेत. घरातून बाहेर पडणेही धोक्‍याचे ठरत आहे. यामुळे येथील शेतीला यंदा घरघर लागली आहे. द्राक्षबागेची सगळी कामे ठप्प आहेत. ती किती दिवस ठप्प राहणार, याची खात्री कोण देणार? आज 50 रुग्ण आहेत, उद्या ते वाढले तर...? आणखी काही दिवस गावबंदी होईल. जगलं तर पाहिजे, घरात थांबलं पाहिजे; पण शेतीचं काय करायचं, हा प्रश्‍न इथल्या प्रत्येक माणसाला पडला आहे. 

बिळूर गावात हजार एकराहून अधिक द्राक्षबागा उभारल्या आहेत. दुष्काळात द्राक्षेबागेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता निर्माण करू पाहणाऱ्या बिळूर गावचे वैभव अडचणीत सापडू शकते. या बागांमध्ये दोन हजारांहून अधिक मजूर राबतात. त्यांची रोजीरोटी त्यावर चालते. त्यांना आता कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण बनत चालले आहे. गावात चार डेअरी आहेत. बिळूरसह आसपासच्या गावातून एकूण 20 हजार लिटर दुधाचे संकलन होते. इतर वेळी दुग्ध व्यवसायाला 32 रुपये लिटर भाव मिळतो. आता गाव ठप्प आहे. दूध संकलन करणार कसे? नुकसान होतेय. आपला जीव वाचवावा की या मुक्‍या प्राण्यांचा, असे संकट आहे. 

भाजीपाला सडतोय 
बिळूर गावासह परिसरात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. जतच्या भाजीपाला सौद्यात व किरकोळ विक्रीसाठी शेतकरी दाखल होतात. बिळूर गावच्या सर्व सीमा बंद आहेत. शेतकऱ्यांना शिवारात जाता येत नाही. त्यामुळे भाजीपाला शेतातच सडत असल्याचे चित्र आहे. 


पिठाच्या गिरण्याही बंद आहेत. गरीब, श्रीमंत सारे अडचणीत आहेत. गरिबांना शासकीय मदत पोचण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे. कोणीही घाबरून जाऊ नये, या संकटाला सर्वांनी धैर्याने सामोरे जावे. 
- मंगल नामद, सदस्या, जिल्हा परिषद 

बिळूरमध्ये इस्त्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला 24 जूनला कोरोना झाला. लगेच खासगी रुग्णालयातील परिचारक, किराणा व खत दुकानदारांना लागण झाली. प्रथम बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आणखी रुग्ण वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. 
- डॉ. प्रमोद कांबळे, वैद्यकीय अधिकारी, बिळूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com