सांगली एसटी विभागाला 55 कोटींचा फटका

coronavirus impact state transport sangli district
coronavirus impact state transport sangli district

सांगली - "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "एसटी' चे चाक जागेवरच थांबल्यामुळे गेल्या दोन महिन्यात सांगली विभागाला तब्बल 55 कोटी रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. रोजचे 75 ते 80 लाखाचे उत्पन्न दोन महिने बुडाले. "प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन अगोदरच तोट्यात असलेली एसटी सध्या निम्म्या क्षमतेने धावू लागली आहे. एसटीचे चाक पुन्हा रूळावर येण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज भासू लागली आहे. 

एसटी महामंडळाला राज्यात प्रचंड तोटा होत असल्यामुळे "भारमान वाढवा' अभियान सुरू करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्यानुसार एक मार्च ते 30 एप्रिल या दोन महिन्याच्या काळात हे अभियान राबवले जाणार होते. चालक-वाहकांचे प्रबोधन करून त्यांना प्रवासी वाढवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अभियान सुरू झाले होते. प्रवाशासाठी जागेवर एसटी थांबत असल्यामुळे अभियानाचे कौतुक होत होते. परंतू अभियानाच्या दुसऱ्याच आठवड्यात "कोरोना' चा देशात शिरकाव झाला. राज्यात रूग्ण आढळल्यामुळे 14 मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. एसटीने देखील 14 मार्चपासून 23 मार्चपर्यंत हळूहळू फेऱ्या कमी केल्या. तर "लॉकडाउन' लागू झाल्यापासून एसटीचे चाक जागेवरच थांबले. 

सांगली विभागात सुमारे 850 गाड्यांच्या रोजच्या 6 हजार 36 फेऱ्या बंद झाल्या. सांगली विभागातून दररोज दोन लाख 71 हजार किलोमीटर धावणाऱ्या एसटीचे चाक थांबल्यामुळे रोजचे 75 ते 80 लाखाचे उत्पन्न थांबले. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्या महिन्यात म्हणजे 23 एप्रिलपर्यंत 2 लाख 25 हजार 741 फेऱ्या थांबल्या गेल्या. त्यामुळे एक कोटी एक लाख 95 हजार किलोमीटरचे अंतर कापले गेले नाही. त्याचा परिणाम म्हणून 30 कोटी 27 लाख 65 हजार रूपयाचे उत्पन्न बुडाले. त्यानंतर "लॉकडाउन' च्या दुसऱ्या महिन्यात 23 एप्रिल ते 23 मे अखेर रोजचे 75 ते 80 लाखाचे उत्पन्न या सरासरीने 25 कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. "लॉकडाउन' च्या दोन महिन्याच्या काळात अंदाजे 55 कोटीचे नुकसान झाले आहे. 

लॉकडाउनच्या काळात दोन आठवड्यापूर्वी परप्रांतिय मजुरांना सोडण्यासाठी एस. टी. धावली होती. त्यामुळे जवळपास एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले. त्यानंतर 22 मे पासून एसटी पुन्हा धावू लागली आहे. परंतू निम्मी आसन क्षमतेइतकेच प्रवासी भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एसटी पुन्हा एकदा तोट्यातच धावत आहे. 

वर्षात दुसरा फटका 

महापुराच्या काळात एसटीच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे तसेच सांगलीसह काही आगारात महापुराचे पाणी गेल्यामुळे एसटीचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर एसटी सावरत असतानाच पुन्हा एकदा दोन महिने चाक थांबल्यामुळे 55 कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com