अदानी, अंबानींच्या भल्यासाठी राफेलचा घाट - ऍड. प्रकाश आंबेडकर

अदानी, अंबानींच्या भल्यासाठी राफेलचा घाट - ऍड. प्रकाश आंबेडकर

सोलापूर - भाजप सरकार 714 कोटी रुपयांचे राफेल विमान तब्बल एक हजार 600 कोटी रुपयांना खरेदी करत आहे. दुसरीकडे त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर वर्षाला तब्बल एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याची जबाबदारी अदानी-अंबानी यांच्या कंपनीकडे देऊन त्याद्वारे पक्षनिधी उभा करण्याचा घाट भाजपकडून घातला जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

सर्वसामान्यांच्या पैशावर आजवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेनेने डल्ला मारला. फरक इतकाच, की कॉंग्रेस-राष्ट्रवादी उघड पैसे खात होते, तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार केला जातोय, असा आरोप ऍड. आंबेडकर यांनी सोलापुरात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात केला. या वेळी पद्मश्री लक्ष्मण माने, आमदार बळिराम शिरसकर, माजी आमदार ऍड. विजय मोरे, अर्जुन सलगर, एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख, समीउल्ला शेख, शिवानंद हैदापुरे, जयसिंग शेंडगे, डॉ. इंद्रकुमार भुसे, अरुण जाधव, शंकरराव लिंगे, शफी हुंडेकरी, अश्‍विनी राठोड, डॉ. दशरथ भांडे, राजाभाऊ शिंदे, बबन जोगदंड, विष्णू गायकवाड, श्रीशैल गायकवाड, भारती कोळी, विश्रांती भुसनर, राजन दीक्षित आदी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते. या वेळी ऍड. आंबेडकर म्हणाले, ""70 वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांनी काहींचे आरक्षण हिरावले तर काहींचे रद्द केले. आरक्षण, बेरोजगारी, व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. भीक नको सत्तेची.. सत्ता मिळवू हक्‍काची.. बहुजन सारे एक होऊया अन्‌ सत्ता मिळवूया.'' 

एक मत दहा हजाराला विका 
राजकारणाचा खर्च आता वाढला असून सर्वसामान्यांना निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे मतदारांनी मते विकावी परंतु, एक हजाराला नव्हे तर दहा हजार रुपये घ्या. सोलापुरात पाकीट संस्कृती असून ते आल्याशिवाय कोणी घराबाहेर पडत नसल्याचा मला अनुभव आहे. 
- लक्ष्मण माने, लेखक 

मोदी हे चोरच आहेत 
2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीसुद्धा मी त्यांना चोरच म्हणणार. भाजपची मोदी लाट घालविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसमवेत कॉंग्रेसला घेऊ. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजपवर टीका केली. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचे आरोप फेटाळले. त्यामुळे आता कॉंग्रेस राष्ट्रवादीसमवेत युती करणार का? त्यांची नीतिमत्ता पाहावी लागेल, असेही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com