#SataraFlood अन नगरसेवकांनी वाचविले वृद्धांचे प्राण

सचिन देशमुख
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या गाडीत बसवून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले.

करा्हाड ः पुराच्या पाण्याने वेढा दिलेल्या येथील कोयना दूध कॉलनीतील जिव्हेश्वर मंदिर येथे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या वृद्ध दांपत्यांची नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे यांच्यासह युवकांनी आज (बुधवार) सुखरूप बाहेर काढून सुटका केली. 

कोयना दूध कॉलनीतील जिव्हेश्र्वर मंदीरात वृध्द कुटुंब अडकून पडल्याचे समजातच नगरसेवक श्री. पाटील, श्री. हिंगमिरे यांच्यासह अख्तर आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण, सतिश भोंगाळे, महेश कदम, चंदू काशिद, महेश जंबुरे  यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पूराच्या पाण्याने वेढलेल्या या भागात चार फूटाहून अधिक पाणी होते. त्यातून वाट काढत व अग्निशमन विभागाचे श्री. अडसूळ, बांधकाम विभागाचे  उपअभियंता रतन वाढई यांच्यासोबत जिव्हेश्वर मंदिरच्या पहिल्या मजल्यावर पोहचले. तेथे असणाऱ्या वृध्दाच्या पायाची शस्त्रक्रीया झाल्याने त्यांना पाण्याला पाय लागू न देता बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे सौरभ पाटील व सचिन चव्हाण यांनी त्यांना उचलून मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले. तेथे असलेल्या शिडीवर ब्लॅंकेट टाकून त्यांना त्यावर झोपवण्यात आले. त्यानंतर श्री. पाटील, श्री. आंबेकरी,  नगरसेवक हिंगमिरे, श्री. वढाई, श्री. अडसूळ अन्य अग्नीशमनच्या कर्मचाऱयांनी संबंधितांना मुख्य रस्त्यापर्यंत सुखरूप बाहेर आणले. संबंधित वृध्द महिला घाबरल्याने श्री. आंबेकरी यांनी त्यांना धीर देत पाण्या बाहेर काढले. संबंधितांना पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या गाडीत बसवून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporaters saves life of old age citizens