नगरसेवक खून प्रकरणी भाजपच्या जि.प.सदस्याला अटक

अभय जोशी
बुधवार, 18 एप्रिल 2018

पंढरपूर: येथील अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यास पोलिसांनी कळंबा जेल मधून ताब्यात घेऊन आज (बुधवार) येथील न्यायालयात हजर केले. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आरदवाड यांनी अंकुशराव यास 21 एप्रिल पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संदिप पवार खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे.

मागील महिन्यात 18 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी अपक्ष नगरसेवक संदिप पवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करुन व कोयत्याने वार करुन त्यांचा निघृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी मयत संदिप पवार यांची आई माजी नगराध्यक्षा व विद्यमान अपक्ष नगरसेविका सुरेखा पवार यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

दरम्यान, वडार समाजाने मूक मोर्चा काढून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी मुख्य सूत्रधारा विषयी भक्कम पुरावे मिळाले असून लवकरच अटक केली जाईल असे जाहीर केले होते.

दरम्यान, हार्डवेअर व्यापारी शशिकांत मुळे यांना मारहाण करुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी याच्या विरुध्द मागील वर्षी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याला अटक केली आहे. तो कळंबा येथील जेल मध्ये असताना संदिप पवार खून प्रकरणाचे धागेदोरे त्याच्या पर्यंत पोचत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला कळंबा जेल मधून ताब्यात घेऊन आज येथे आणले. दुपारी न्यायालयाने त्यास 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता संदिप पवार खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 13 झाली असून, आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: corporator sandeep pawar murder case gopal ankushrao arrested