" या' महापालिकेतील नगरसेवक "राष्ट्रवादी' सोबतच 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महापालिकेत शिवसेनेचे मिळेल सहकार्य 
राज्यात भाजप-शिवसेनेत कितीही वितुष्ट आले तरी त्याचा परिणाम महापालिकेतील संबंधावर होणार नाही. आम्हाला महापौर निवडणुकीत शिवसेनेचे सहकार्य मिळेल आणि भाजपचाच महापौर आणि तोही मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईल. 
- श्रीनिवास करली, सभागृह नेता 
सोलापूर महापालिका 

सोलापूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेतील चारही नगरसेवक हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच असतील, असा ठाम विश्‍वास शहराध्यक्ष भारत जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे चार डिसेंबरला होणाऱ्या महापौर-उपमहापौर निवडणुकीतील रंगत आणखीन वाढणार आहे. 

हेही वाचा... बारामतीकर पवार साहेंबासोबतच....

चारही नगरसेवक पवारांच्याच पाठीशी 
राज्याच्या राजकारणात आज शनिवारी झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कोणाच्या पाठिशी जाणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्या संदर्भात विचारले असता श्री. जाधव म्हणाले,""आमचे चार नगरसेवक आहेत. हे सर्वजण शरद पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडतील असे वाटत नाही. हे चारही नगरसेवक पक्षात राहतील याबाबत विश्‍वास आहे.'' 

हेही वाचा... अजीत पवार यांना भाजपने ब्लॅकमेल केले. तेही परत येतील...

भाजपकडून होऊ शकतो "हा' प्रयत्न 
महापालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. स्पष्ट बहुमतासाठी आणखी चार नगरसेवकांची गरज आहे. अजीत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा पाहता त्याचे पडसाद महापालिकेच्या राजकारणावर उमटतील अशी चर्चा होती. मात्र तूर्त तरी हे शक्‍य दिसत नाही. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला तर, इतर पक्षाच्या मदतीची गरजच भाजपला पडणार नाही. त्यामुळे या नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. मात्र त्यास कितपत यश मिळेल हे काळच दाखवून देणार आहे. 

हेही वाचा... शरद पवारांनी दिला फुटणाऱ्या आमदारांना थेट हा दम

यंदाच्या भूमिकेकडे आहे लक्ष 
महापालिकेत भाजपचा महापौर करायचा असेल तर 53 नगरसेवक हवेत. सध्या त्यांचे 49 नगरसेवक आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीवेळी एमआयएम, बसप आणि माकप तटस्थ राहिले. त्याचा फायदा झाला आणि भाजपच्या शोभा बनशेट्टी निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांचा पराभव केला. या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्याच्या विभागणीचा फायदा बनशेट्टी यांना झाला होता. येणाऱ्या महापौर निवडणुकीत इतर पक्षांची काय भूमिका असणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The corporetors of this 'municipal corporation' along with the nationalist congress party