भ्रष्टाचारमुक्त विकासपर्वाचा प्रारंभ महापौर : संगीता खोत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली : महापालिकेत आजपासून भ्रष्टाचारमुक्त विकास पर्वाचा प्रारंभ झाला आहे. जनतेने विश्‍वासाने भाजपच्या हातात सत्ता दिली आहे. स्वच्छ, पारदर्शी कारभार करुन तीनही शहरांचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही भाजपच्या पहिल्या महापौर संगीता खोत यांनी आज दिली. 

सांगली : महापालिकेत आजपासून भ्रष्टाचारमुक्त विकास पर्वाचा प्रारंभ झाला आहे. जनतेने विश्‍वासाने भाजपच्या हातात सत्ता दिली आहे. स्वच्छ, पारदर्शी कारभार करुन तीनही शहरांचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही भाजपच्या पहिल्या महापौर संगीता खोत यांनी आज दिली. 

महापौर खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मिरवणुकीने महापालिकेत जाऊन पदग्रहण केले. 
महापालिकेत प्रथमच भाजपची स्पष्ट बहुमताने सत्ता आली आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवड गेल्या सोमवारी झाली होती. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपने विजयोत्सव टाळला होता. आज सकाळी स्टेशन चौकातून महापालिकेपर्यंत विजयी मिरवणूक निघाली. नुतन पदाधिकाऱ्यांसह भाजपचे सर्व नगरसेवक सहभागी झाले. फेटे बांधून निघालेली ही मिरवणूक भाजपचे शहरातील शक्तीप्रदर्शन होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश आवटी, दिलीप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

श्रावणधारां वर्षावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्‍यांच्या दणक्‍यात मिरवणुक निघाली. सर्वांनी भगवे फेटे परिधान केल्याने वातवरण भगवे झाले होते. पावसाने काही वेळातच विश्रांती घेतल्याने महापालिकेपर्यंत मिरवणूक जल्लोषात पार पडली. मिरवणुकीत धनगरी ढोल पथकही सहभागी झाले होते. स्वागतासाठी आज महापालिकेत रांगोळी काढण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली होती. कक्षातील गणेशमूर्तीला पुष्पहार घालून त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट देखील महापालिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि सरचिटणीस मकरंद देशपांडे होते. 

बापट यांनी महापौर खोत यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपमहापौर व गटनेत्यांनी आपआपल्या कक्षात पदभार स्वीकारला.

"मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी तसेच वित्त आयोगाच्या प्राप्त 25 कोटीच्या निधीतून प्राधान्यक्रमाने भाजी मंडई, क्रीडांगणे, बागा ही कामे मार्गी लावू. एकजुटीने कारभार करुन सर्व शहरांचा समतोल विकास साधू.''
- महापौर संगीता खोत

"मागील सत्ताकाळातील गैरव्यवहारांच्या चौकशी केली जाईल. महापालिकेचा कारभार गतीमान होईल.'' 

- उपमहापौर धीरज सुर्यवंशी

"तीनही शहरांचा समतोल विकास करु. अपुऱ्या ड्रेनेज आणि पाणी पुरवठा योजना तसेच रस्त्यांची कामे मार्गी लावू. शेखर इनामदार दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवतील. पालिकेचे उत्पन्न वाढ व गळतीही कमी करु.''
- आमदार सुधीर गाडगीळ 

"पारदर्शक कारभारबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा आग्रह आहे. आम्ही इथेही तो आग्रह ठेवू. गतीमान कारभार केला जाईल. भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने भाजपवर विश्‍वास टाकला आहे. मागील काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करु.''
- खासदार संजय पाटील 

Web Title: Corruption free development begins Mayor: Sangeeta Khot