बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्च गुलदस्त्यातच

तात्या लांडगे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुका होऊन आता दीड महिन्याचा कालावधी संपला. परंतु, या निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला याचा ताळमेळ अद्यापही लागलेला नाही. संबंधित बाजार समित्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत असतानाही निवडणुकीचा खर्च जाहीर झाला नाही.

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुका होऊन आता दीड महिन्याचा कालावधी संपला. परंतु, या निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला याचा ताळमेळ अद्यापही लागलेला नाही. संबंधित बाजार समित्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत असतानाही निवडणुकीचा खर्च जाहीर झाला नाही.

सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रती मतदार 50 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निवडणुकीपूर्वी सोलापूर व बार्शी या दोन्ही बाजार समित्यांकडून निवडणूक निधी घेण्यात आला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार या बाजार समित्यांकडून घेतलेल्या निधीतील निम्मी रक्‍कम त्यांना परत करावी लागणार आहे. परंतु, त्याबाबतची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने बाजार समित्यांची मोठी रक्‍कम निवडणूक शाखेकडे अडकून पडल्याचे दिसून येते. मतदार याद्या बनविणे व प्रसिद्ध करणे, मतदार याद्यांच्या छायांकित प्रती काढणे, मतदान साहित्यांची वाहतूक, नियुक्‍त कर्मचाऱ्यांचा भत्ता, चहा-पाणी, जेवण याचाही खर्च बाजार समितीच्या निवडणूक निधीतून कपात करण्यात येणार आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार प्रती मतदार 50 रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्चाचा हिशेब प्राप्त झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल. 
- यशवंत गिरी, सचिव, सहकार निवडणूक प्राधिकरण 

आकडे बोलतात... 
सोलापूर बाजार समिती
 
मतदान केलेले मतदार 
59,350 
अपेक्षित खर्च 
29,67,500 रुपये 
बाजार समितीने दिलेला निधी 
86.20 लाख 

बार्शी बाजार समिती 
मतदान केलेले मतदार 
61,172 
अपेक्षित खर्च 
30,58,600 रुपये 
बाजार समितीने दिलेला निधी 
74.50 लाख

Web Title: The cost of the election of the market committees is not open