कापसामुळे बळीराजाच्या जीवनात झालाय गुंता, गाड्या यार्डात अडकल्याने संसाराचाही अडला गाडा

Cotton vehicles stuck in Chapadgaon center
Cotton vehicles stuck in Chapadgaon center

शेवगाव : राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघातर्फे तालुक्‍यातील चापडगाव येथे सुरू असलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बंद असल्याने तेथे शेतकऱ्यांची शंभर वाहने अडकून पडली आहेत. एका महिन्यापेक्षा अधिक काळ कापसासह उभ्या असलेल्या वाहनांचे चालक-मालक वैतागले असून, त्याच्या भाड्याचा भुर्दंड नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 

तालुक्‍यातील कापूसउत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाचे चापडगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू होते. तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी तेथे विक्रीसाठी कापूस आणत. त्यासाठी स्वतःचे व भाड्यापोटी आणलेले वाहन रांगेत उभे करावे लागे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर संसर्ग होऊ नये, म्हणून गर्दी टाळण्यासाठी 20 मार्चपासून केंद्र बंद करण्यात आले. त्या वेळी तेथे नोंद केलेली व कापूस भरून आणलेली 105 ते 120 वाहने उभी होती.

आज ना उद्या केंद्र सुरू होऊन वाहन रिकामे होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आणलेली वाहने यार्डामध्ये उभी केली. ती आजतागायत उभी आहेत. त्यात अनेक वाहने भाड्याने आणलेली आहेत. शिवाय पुन्हा गावी नेऊन त्यातील कापूस काढणे परवडणारे नाही. उन्हात उभ्या असलेल्या वाहनांमुळे कापसाचे वजन घटत आहे, वाहनांचा मेंटेनन्स, भाडे असा तिहेरी भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

वर्षभरात पिकवलेला माल तेथे एक महिन्यापासून अडकून पडल्याने संचारबंदीच्या काळातही शेतकऱ्यांना तेथे चोरून लपून येऊन मुक्काम करावा लागत आहे. वारंवार चकरा मारून शेतकरी व वाहनचालक वैतागले आहेत. शासनाने किमान तेथे उभ्या असलेल्या वाहनातील कापूस तातडीने खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 
शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्याच धर्तीवर तालुक्‍यातील चापडगाव येथील एकमेव कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- रामनाथ राजपुरे, माजी सभापती, बाजार समिती, शेवगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com