बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त

संजय काटे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य श्रीगोंदे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहे. दरम्यान, बारामती व खडकी (ता. दौंड) येथील दोन आरोपींनाही आज अटक केली. याशिवाय अन्य दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

श्रीगोंदे (नगर): बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य श्रीगोंदे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहे. दरम्यान, बारामती व खडकी (ता. दौंड) येथील दोन आरोपींनाही आज अटक केली. याशिवाय अन्य दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 
सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित व त्यांच्या पथकाने बनावट नोटा प्रकरणातील पहिला आरोपी अतुल आगरकर याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून बारामती येथील श्रीकांत माने याला अटक केली. त्यातून या प्रकरणाचे गूढ उलगडले. 

पोलिसांनी मानेचा साथीदार आणि या गुन्ह्यातील मास्टर माईंड युवराज लक्ष्मण कांबळे (वसंतनगर, बारामती) व त्याचा नातेवाईक सुमीत भीमराव शिंदे (खडकी, दौंड) यांना अटक केली. यातील शिंदेच्या घरातून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर, संगणक आदी साहित्य जप्त केले आहे. या आरोपींच्या सांगण्यावरून इतर दोन संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. 
गावित म्हणाले, की या प्रकरणात आता चार जणांना अटक झाली असून, दोन जण ताब्यात घेतले आहेत. आरोपींची संख्या नेमकी किती आहे याची निश्‍चित माहिती समजत नसली, तरी अटक केलेल्या आरोपींकडून या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळत आहे. 
आरोपी कांबळे व शिंदे यांनी काही बनावट नोटा व त्यासाठी लागणारे कागद खडकी (ता. दौंड) येथील एका ओढ्याच्या पाण्यात सोडून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथील पाण्यात उतरून तपासणी केली; मात्र नोटा मिळाल्या नाहीत. काही कागद हाती लागल्याचे समजते. 

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न 

या प्रकरणात अटक केलेल्या मानेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील एका महिलेच्या सांगण्यावरून हे सगळे सुरू असल्याचा कांगावा केला. मात्र, ही दिशाभूल असल्याचे समोर येत असून, माने व कांबळे हे दोघे एकत्रित या बनावट नोटा तयार करीत असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. यात आणखीही काही लोक सहभागी असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit currency printing materials seized