मांडवगण, खडकी येथे छापल्या बनावट नोटा

संजय काटे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

बनावट नोटा बाळगणाऱ्या अतुल आगरकर याला ताब्यात घेतल्यानंतर गेल्या पाच दिवसांत श्रीगोंदे पोलिसांनी अथक कष्ट घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या बनावट नोटा खडकी (ता. दौंड) व मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथे छापण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.

श्रीगोंदे : बनावट नोटा बाळगणाऱ्या अतुल आगरकर याला ताब्यात घेतल्यानंतर गेल्या पाच दिवसांत श्रीगोंदे पोलिसांनी अथक कष्ट घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या बनावट नोटा खडकी (ता. दौंड) व मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथे छापण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. त्यात श्रीगोंदे, पारनेर व बारामती येथील सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल व सुमारे तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या धास्तीने सात लाखांच्या अशा नोटा आरोपींनी पाण्यात सोडल्या. 

पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश गावित, पोलिस अधिकारी अमित माळी, कर्मचारी विकास वैराळ, अमोल कोतकर, अमोल शिंदे, संजय कोतकर यांनी हा तपास केला. सात जणांना अटक करून हे प्रकरण उघडकीस आणले. पत्रकारांना माहिती देताना पोलिस उपअधीक्षक संजय सातव म्हणाले, ""सुपे (ता. पारनेर) येथील आगरकर याच्याकडून दोन लाख 83 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्याच्या ताब्यातील पाच लाखांची मोटारही जप्त करून त्याला अटक केली. नंतर पोलिसांनी त्याचा साथीदार श्रीकांत माने, युवराज लक्ष्मण कांबळे (दोघे बारामती), शिवाजी रामदास जरे (पिंपळगाव पिसे), सुमीत भीमराव शिंदे, अमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे (तिघे रा. खडकी, ता. दौंड) या आरोपींनाही अटक केली आहे. 

आगरकरच्या माहितीवरून इतर आरोपींपर्यंत पोलिस पथक पोचले. यात बारामती येथील माने याने इमारतीवरून उडी मारण्याची धमकी पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याला पकडलेच. त्याच्या माहितीवरून कांबळेला पकडले आणि नंतर खडकी येथे बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त करीत अन्य तिघांना अटक केली. 

समोर आलेल्या माहितीवरून, माने, कांबळे व जरे हे यातील मास्टरमाइंड आहेत. यांनी एकत्र येऊन या नोटा छापल्या. आगरकरला आधी काजू व बदाम कमी किमतीत घेण्यासाठी दहा लाखांच्या बनावट नोटा हव्या होत्या. नंतर सोने घेण्यासाठी ही रक्कम लागते, असे सांगितले. खडकी व मांडवगण येथे नोटांची छपाई न उरकल्याने माने याने पुण्यातील "त्या' महिलेकडून अडीच लाखांच्या बनावट नोटा आणून दहा लाखांच्या नोटा पूर्ण केल्या. मात्र, श्रीगोंदे पोलिसांच्या दक्षतेने ही सगळी खेळी उघड झाली. 

बड्या व्यक्तीवर पोलिसांचा "वॉच' 

घोगरगावच्या सराईत गुंडाचा सहभाग 
घोगरगाव परिसरातील एक सराईत गुंड या सर्व आरोपींच्या बरोबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने आरोपींना नुसती मदतच केली नाही, तर त्यांच्याकडील काही नोटा चलनातही आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नोटा त्याने घेतल्याचे पुढे आले आहे. हा गुंड अजून पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, बारामती येथील एका बड्या व्यक्तीवर पोलिसांचा "वॉच' आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit notes printed at Mandavgan, Khadki