हतबलतेच्या अशाही दोन गोष्टी...! 

हतबलतेच्या अशाही दोन गोष्टी...! 

कोल्हापूर -  पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद होऊन आज दहा दिवस पूर्ण झाले; मात्र त्यापैकी सोमवारचा अपवाद वगळता एकही दिवस बॅंका आणि एटीएम सेंटरसमोरची गर्दी हटता हटेना, असे चित्र आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या असल्या तरी त्याच वेळी एटीएमवरून दिवसा केवळ दोन हजार रुपयेच मिळत असल्याने बहुतांश व्यवहार खोळंबले आहेत. अनेक बॅंकांनी अजूनही एटीएम सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केलेली नाहीत आणि त्यामुळे जी एटीएम सेंटर सुरू होतात तेथील रक्कमही केवळ पाच ते सहा तासांत संपते आणि पुन्हा सेंटर बंद पडते, अशी स्थिती कायम आहे. दरम्यान, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हतबलतेचीही विविध रूपं पुढं आली. 

"सहल' बॅंकेच्या दारात 

आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. स्वतःकडे पाहायला साधा वेळही मिळाला नाही. कुठे फारसे फिरता आले नाही. निवृत्तीनंतर मात्र आता जगणं "एन्जॉय' करायचे आहे, असा निर्धार शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. त्यासाठी विविध संकल्पना पुढे आल्या आणि दोन किंवा तीन महिन्यांतून एकदा सहलीचा बेत पक्का केला. काही ज्येष्ठांनीच "ना नफा ना तोटा' तत्त्वावर अशा सहलींच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या महिन्याच्या सहलीचे बुकिंग महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झाले. सात तारखेपर्यंत सर्वांना मुदत दिली गेली. पन्नास ते साठ जणांनी सहलीचे "कॉन्ट्रिब्युशन' जमा केले. ही रक्कम पाच ते सहा लाखांच्या घरात गेली. आता वाहने, हॉटेल आणि इतर गोष्टींच्या बुकिंगसाठी फोनाफोनी करण्याची धांदल सुरू होणार इतक्‍यात पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाला. सहल संयोजकांचे टेन्शन वाढले. मग त्यांनी काही लोकांना संपर्कही केला; पण आता आम्ही पैसे तुमच्याकडे जमा केलेत. आता तुम्हीच काही तरी करा, अशाच सूचना त्यांना ऐकायला मिळाल्या. अखेर संयोजकांना स्वतःच्या दुकानातील पाच ते सहा पोरांना रोज बॅंकेच्या दारातील रांगेत नोटा बदलून घेण्यासाठी उभे करावे लागले. चार-चार हजाराने अजूनही संपूर्ण रक्कम हातात येण्याची शक्‍यता कमी आहे आणि संपूर्ण रक्कम बॅंकेत खात्यावर भरली तर सहली वेळी नेमकी किती रक्कम काढता येणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. 

"साल' नसलेल्या नोटा 

कावळा नाका परिसरातील फर्निचरचे साहित्य विकणाऱ्या एका विक्रेत्याकडे चार दिवसांपूर्वी घाईघाईने एक जण आला. अँटिक लहान स्टूल, टी-पॉय, लाकडी नाइट लॅम्प असे दोन हजारचे साहित्य विकत घेतले. पाचशेच्या चार नोटा काढून विक्रेत्याकडे त्याने दिल्या. विक्रेता नको पाचशेच्या नोटा असे म्हणत असतानाही बॅंकेतून बदलून घे रे आणि नाही बदलून दिल्या तर हा घे माझा मोबाइल नंबर असे मोठ्या अविर्भावात सांगत त्याने मोबाइल नंबरही दिला. मुळात सकाळपासून एकही वस्तू विकली गेली नसल्याने "घेता येतील बदलून कुठून तरी नोटा' अशी मानसिकता करून त्या विक्रेत्याने अखेर नोटा घेतल्या. काही वेळाने विक्रेत्याचा सहकारी तेथे आला. घडलेला प्रकार समजताच त्याने "बघू या नोटा' म्हणून त्या हातात घेतल्या आणि चारपैकी तीन नोटांवर सालच नसल्याचे लक्षात आले. साल नसलेल्या नोटा चलनातून यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र सध्याच्या परिस्थितीचा अगदी व्यवस्थित फायदा करून घेत अशा नोटा त्या विक्रेत्याच्या माथी मारल्या गेल्या. दीड हजाराचे नुकसान झाले याचे काहीच वाईट वाटत नाही; पण या प्रवृत्तीचे करायचे काय, असा त्या विक्रेत्याचा संतप्त सवाल आहे. 

काटकसरीची लागली सवय 

सहल संयोजक असो किंवा कावळा नाका परिसरातील विक्रेता ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं; मात्र गेल्या दहा दिवसांत हतबलतेची अशी अनेक रूपं समोर येत आहेत. आणखी काही दिवस ती अस्तित्व दाखवतच राहणार आहेत. मात्र काहीही असले तरी लोकांना काटकसरीची सवय लागली, असा सकारात्मक प्रवाह नक्कीच पुढे येतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com