ग्रामीण भागात कोविड सेंटरमुळे बेडसाठीचा ताण कमी झाला : जितेंद्र डुडी

अजित झळके
Sunday, 27 September 2020

सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कमी होतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर बेडची सोय झाल्यामुळे सांगली, मिरजेसह शहरातील कोविड रुग्णालयांवरील ताणही कमी झाला आहे.

सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कमी होतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर बेडची सोय झाल्यामुळे सांगली, मिरजेसह शहरातील कोविड रुग्णालयांवरील ताणही कमी झाला आहे. आपल्याच गावात प्राथमिक उपचार आणि परिस्थितीनुसार होम आयसोलेशनची सोय झाली असल्याने रुग्णांमध्ये भिती कमी झाली आहे, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यात 59 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 240 बेडची व्यवस्था आहे. तेथे आवश्‍यकतेनुसार ऑक्‍सिजन पुरवठाही सुरु झाला आहे. त्यासाठी अजून आवश्‍यक ऑक्‍सिजन सिलिंडर खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. जेणेकरून ही वैद्यकीय सुविधा भविष्यातही उपयुक्त ठरेल. तेथे आवश्‍यक औषधेही उपलब्ध केली आहेत.

त्यामुळे येथे आलेले रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे प्रमाण सुमारे 40 टक्के आहे. अन्य रुग्णांना कोविड रुग्णालयात पाठवावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची शहरात येऊन दाखल होण्याची धडपड कमी झाली आहे. जिल्हा परिषदेतील सेंटरमध्ये याआधी दररोज 110 ते 120 फोन येत होते. काल ते फक्त 28 होते. याचा अर्थ बेडसाठीचा ताण कमी झाला आहे.'' 

ते म्हणाले, ""माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आमचे कर्मचारी घरोघरी जात आहेत. तपासणीतून लक्षणे नसलेले रुग्ण समोर येत आहेत. ते तपासणी करून घरी उपचार घेत आहेत. त्यांचे घरीच बरे होण्याचे प्रमाण लक्षणिय आहे. आता ही मोहिम विस्तारली पाहिजे. त्यासाठी सरपंच, सदस्यांनी पुढे यावे. प्रभात बैठक घ्यावी. नियोजन करावे, त्यांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे. काही लोक सर्वेक्षण करणाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यांना विश्‍वासात घ्यावे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना साथ द्यावी. मास्क सक्ती करावी. कारण, कोणत्याही औषधापेक्षा मास्क जास्त प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.'' 

आरोग्य कर्मचारी, माझा अभिमान 

जितेंद्र डुडी म्हणाले, ""जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर, आशा वर्कर्स खूप काम करत आहेत. त्यांची धडपड अतुलनिय आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या धडपडीला सलाम करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी "माझा आरोग्य कर्मचारी, माझा अभिमान' ही योजना राबवत आहेत. गावोगावी या कर्मचाऱ्यांना एक फूल देऊन तरी लोकांनी त्यांचे स्वागत करावे.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Center in rural areas reduces stress for beds: Jitendra Dudi