सीपीअार; कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा जिवंत वारसा

सीपीअार; कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा जिवंत वारसा

१३३ वर्षांपूर्वीची इमारत - याच ठिकाणाचे करून टाकले गोदाम; वैभव जपण्याकडे दुर्लक्ष

कोल्हापूर - ही वास्तू १३३ वर्षांपूर्वीची आहे. गॉथिक शैलीतली दगडी बांधकामाची आहे. ज्याने नवीन राजवाडा बांधला त्याच मेजर चार्ल्स माँट या स्थापत्यकाराने ही वास्तूही बांधली आणि बांधकाम खर्चाचे जे बजेट धरले होते त्यापेक्षा चक्क २२७ रुपये कमी खर्चात ही वास्तू बांधून पूर्ण झाली. ही वास्तू छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळाची आहे. 

ही वास्तू म्हणजे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा १३३ वर्षांचा जिवंत वारसा आहे; पण वारसा जपायचा असतो, टिकवायचा असतो हेच माहीत नसलेल्या आपल्या पिढीने या वास्तूला अक्षरशः गोदाम करून टाकले आहे. वारसा कसा जपावा यापेक्षा वारसा कसा जपू नये, याचे कटू सत्यच या वास्तूच्या रूपाने उभे आहे. 

या इस्पितळाचं आताचं नाव छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ. या प्रमिलाराजे कोण ? छत्रपती शहाजीराजे यांच्या पत्नी व सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या त्या आई. इस्पितळाचे मूळ नाव किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल. या इंग्रज साहेबाचे नाव लोकांना म्हणायला यायचं नाही म्हणून लोक या दवाखान्याला मोठा म्हणजे थोरला दवाखाना म्हणू लागले. नंतर प्रमिलाराजेंचे नाव देण्यात आले; पण ते शॉर्टकटच्या जमान्यात सीपीआर झाले. 

आज सीपीआर मध्यवर्ती ठिकाणी आले आहे; पण १८८१ च्या काळात हा परिसर म्हणजे गावाचं टोक. चौफाळ्याचा माळ म्हणूनच या परिसराला ओळखले जायचे. कोल्हापूर त्या काळात रोगराईचे आगर. पटकीची साथ आली, की हजारभरांनी जगाचा निरोप घ्यायचा हे ठरलेले. मग मरिआईचा गाडा गावच्या वेशीवर म्हणजे चौफाळ्याच्या माळावर सोडला जायचा व मरिआईकडे मदतीची साद घातली जायची. मरिआई मदतीला आली, की माहीत नाही; पण १८८१ मध्ये संस्थानने जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते चौफाळ्याच्या माळावरच या वास्तूची पायाभरणी झाली. मेजर चार्ल्स माँट यांनी गॉथिक वास्तू शैलीवर आधारित वास्तूचा आराखडा तयार केला. मुंबईच्या रामचंद्र महादेव आणि कंपनीने बांधकामाचे कॉन्ट्रॅक्‍ट घेतले. मार्तंड वामन शास्त्री व शेरॉर अभियंते देखरेखीवर होते. वास्तूला अपेक्षित खर्च तीन लाख पाच हजार चारशे चाळीस रुपये होता; पण प्रत्यक्षात २२७ रुपये खर्च कमी झाला. 

ही वास्तू दगडी तीन मजली आहे. उंच छत, दगडी भिंती, लाकडी जिने, इटालियन फरशी, मोठ्या मोठ्या खिडक्‍या, रुंद व्हरांडे यांमुळे ही वास्तू हवेशीर आणि लख्ख उजेड भरून राहिलेली. समोर बाग, सभोवती झाडी, काही अंतरावर रुग्णांसाठी स्वयंपाकघर, कर्मचाऱ्यांसाठी कौलारू घराची रांग असे चित्र होते. पटणार नाही, याच वास्तूच्या पिछाडीस घोड्याची पागा व नंतर त्या ठिकाणी आयटीआय होते. दरबार सर्जन म्हणजे खरोखर बाप मानले जाणारे पद होते. हे सर्जन दवाखान्यात राऊंडला बाहेर पडले तर राऊंड संपेपर्यंत प्रत्येक वॉर्डात एक जरब असे. 

वारसा असा जपायचा का ?
या वास्तूत जवळजवळ १०० वर्षे रुग्ण सेवा घडली. लाखाच्या घरात बाळंतपणे सुखरूप पार पडली. मानसोपचार हा स्वतंत्र उपचार विभाग मानतो; पण सीपीआरमध्ये सुरवातीपासून हा विभाग होता. आज या वास्तूतली रुग्ण सेवा बंद आहे. नवीन इमारतीत ही सेवा सुरू आहे. नवीन इमारतीत इतकी गर्दी, की सीपीआरमध्ये नैसर्गिक हवा यायची बंद झाली आहे. जुन्या गॉथिक शैलीच्या इमारतीत भंगार आणि कोळ्यांची जाळी आहेत. या परिस्थितीत प्रश्‍न आहेत ते अशा पद्धतीने वारसा जपायचा का ? आणि आता या परिस्थितीची जाणीव होऊनही आपण गप्प बसायचे का ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com