सीपीआरच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे उद्या काम बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

कोल्हापूर - सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची 107 पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी गुरुवारी (ता. 20) चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

कोल्हापूर - सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची 107 पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी गुरुवारी (ता. 20) चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

सीपीआरसाठी 318 पदे मंजूर असताना प्रत्यक्ष 211 पदे भरली आहेत. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. सीपीआरमध्ये 26 कक्ष आहेत. त्यात नवीन कक्षही वाढले आहेत. येथे विविध रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात.

त्यांना सेवा देण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. त्यांची संख्या जवळपास दोनशे आहे. मात्र, यात अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या असतात. त्यामुळे एकूण वॉर्डांची संख्या व रुग्णांची वाढती संख्या पाहता उपलब्ध कर्मचारी संख्या कमी पडते. यातच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना केसपेपर काढणे, कॅश गोळा करणे, अशी लिपिकवर्गीय कामे करावी लागतात. त्यामुळे सर्व विभागात पुरेसा कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने एकाच वेळी दोन-तीन वॉर्डांत लक्ष देणे व तेथील कामे करण्याची वेळ एका कर्मचाऱ्यावर येते.

अशात अनेक कर्मचाऱ्यांची सेवा 12 ते 24 वर्षांपेक्षा अधिक काळ झाली आहे तरीही बहुतेकांना पदोन्नती मिळालेली नाही. अशा स्थितीत रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी चतुर्थश्रेणी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी केली आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले वेळेत मिळावीत, अनुकंपा व वारसा हक्कावरील भरती विनाअट तातडीने करावी, पदोन्नतीचा लाभ द्यावा, अशा मागण्यांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासो कवाळे, रघुनाथ कोटकर, सचिव सुरेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

Web Title: cpr worker work close