कचऱ्यापासून इंधन अन्‌ विद्युतनिर्मिती!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कचऱ्यापासून इंधन व विद्युतनिर्मिती करण्याचे संशोधन येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चैतन्य जामदार या विद्यार्थ्याने केले आहे. या प्रकल्पाची त्याने स्वामित्व हक्क नोंदणी केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सल्लागार असलेल्या संस्थेने या प्रकल्पास प्रमाणपत्रही दिले आहे. 
 

सातारा - कचऱ्यापासून इंधन व विद्युतनिर्मिती करण्याचे संशोधन येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चैतन्य जामदार या विद्यार्थ्याने केले आहे. या प्रकल्पाची त्याने स्वामित्व हक्क नोंदणी केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सल्लागार असलेल्या संस्थेने या प्रकल्पास प्रमाणपत्रही दिले आहे. 

सध्या सर्वत्र कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याची चिंता आहे. हीच समस्या पुढे ठेवून चैतन्यने संशोधन सुरू केले. अथक प्रयत्नानंतर त्याचे संशोधन यशस्वी झाले. या प्रकल्पात सुका व ओला या दोन्ही प्रकारच्या कचऱ्यांचे पर्यावरणीय विघटन, जैविक विघटन होऊन जैविक इंधन (बायोडिझेल) तयार होते. या इंधनाचा वापर जनरेटरमध्ये करून वीजनिर्मितीही करता येते. या प्रक्रियेतून उत्कृष्ट दर्जाचे खतही तयार होत आहे. 

याबाबत चैतन्य म्हणाला, ""साधारणपणे एक किलो कचऱ्यापासून 700 ते 750 मिली बायोडिझेल तयार होते. ओला व सुका अशा दोन्ही प्रकारच्या कचऱ्याचे विघटन करण्याकरिता अतिशय सुटसुटीत व तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम असे तांत्रिक साधन वापरण्यात आले आहे. हे तांत्रिक साधन मोठी हॉटेल्स, निवासी संकुले, बंगले, फॉर्म हाउस, टाउनशिपसारख्या ठिकाणी सहज वापरता येईल. या सयंत्राचा वापर करून खत, इंधन आणि वापरासाठी ऊर्जा मिळविता येत आहे. या प्रक्रियेसाठी वीज किंवा बायोगॅस वापरता येतो. त्यामुळे हे सयंत्र व प्रकल्प अतिशय फायदेशीर ठरणार आहे.'' या प्रकल्पासाठी प्राचार्य डॉ. शिवाजी सांगळे, सिव्हिल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा. एच. जी. जगन्नाथ, प्रा. स्वाती जगदाळे, उद्योजक सागर बंड, विकल व दीपक चौरसिया यांनी त्यास मार्गदर्शन केले. पुणे येथील केपीआयटी स्पार्कल कंपनीचे त्याने या प्रकल्पासाठी पेटंट मिळविले आहे. 

संयंत्र व उपयुक्तता 

- एक लिटर इंधन करण्यासाठी 12 रुपये खर्च 
- दहा किलो कचऱ्याचे संयंत्र तयार करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च 
- हॉटेल्स, निवासी संकुले, बंगले, फॉर्म हाउस, टाउनशिपमध्ये वापर शक्‍य 
 

Web Title: create Fuels and Electricity from the Trash