'सकारात्मक ऊर्जा घेत भविष्याचे शिलेदार बना '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कोल्हापूर - सकारात्मक ऊर्जा घेऊन भविष्याचे शिलेदार बना... असा कानमंत्र आज विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी दिला. राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निर्भया पथकाद्वारे "महिला सुरक्षा हक्क व त्यांच्या समस्या' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात आला. 

नांगरे-पाटील म्हणाले, ""रेश्‍मा मानेच्या वडिलांनी मुलीला कुस्तीसारख्या क्षेत्रात घातले, ही कौतुकाची बाब आहे. स्त्रीचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. सध्या छेडछाड, विनयभंग आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. भविष्यात ड्रग्ज, एड्‌ससारखे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत महिलावर्गाने कोणाशी मैत्री करायची, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. विनयभंग, ऍसिड हल्ले, विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ, हुंडाबळी याबाबत महिलांनी कायद्याची माहिती घेतली पाहिजे. पोलिस दल तुमच्या सोबत आहे; मात्र मदत मागण्यासाठी तुम्ही पुढे आले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.'' 

मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, ""विद्यार्थिनींनी आत्मविश्‍वास बाळगून ध्येयाकडे वाटचाल करावी. रोजच्या जीवनात त्यांनी आपल्या आई-वडिलांचा चेहरा समोर ठेवला पाहिजे. निर्भया पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कार्यरत आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी विद्यार्थिनींनी त्याची मदत घ्यावी.'' यानंतर रेश्‍मा माने, हेमल इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्त झालेल्या गडहिंग्लज विभागाचे विश्‍वास कुरणे, इचलकरंजीच्या शरयू देशमुख, करवीरच्या आसमा मुल्लांसह रेश्‍मा माने, हेमल इंगळे यांचा सत्कार झाला. 

निर्भया पथकाच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, प्राचार्य वसंत हेळवी आदी उपस्थित होते.

Web Title: Create positive energy for the future